तौक्ते वादळात शेतकऱ्यांचे नुकसान ; जाणून घ्या कसा केला जातो नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा? कशी मिळू शकते आर्थिक मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवला आहे. मात्र या वादळामुळे राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताची दैना उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या वादळामुळे हिरावून गेले आहे. आंबा, नारळ, फणस, केळी, ऊस, उन्हाळी, भुईमूग, कांदा ,टोमॅटो, वांगी, कारली, दोडका, आदी पिकांना याचा फटका बसलाय. या वादळाने राज्यभर शेडनेट, पॉलिहाऊसचे नुकसान झाले. कोकणात हापूस ला कोट्यवधींचा फटका बसलाय. पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला पिकाला फटका बसलाय. मराठवाड्यात केसर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात पाऊस आणि वादळी वाऱ्याने तारांबळ उडाली तर खानदेशात केळी सह पिकांना फटका बसलाय. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आजच्या लेखात अशा पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कसे केले जातात याबाबतची माहिती घेऊया.

असे केले जातात पंचनामे

नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे तालुकास्तरावर असणाऱ्या महसूल विभागाला नुकसान भरपाईच्या पंचनामे साठी आदेशित करतात. यावेळी तहसीलदार हे झालेल्या वेगवेगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथके गठीत करतात .कृषी क्षेत्रातील पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी गावनिहाय तलाठी,ग्रामसेवक व कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते .सदरील पथक शेत शिवारात जात 33 टक्के पेक्षा जास्त झालेल्या शेतीपिक नुकसानीचे निरीक्षण करत त्याचे पंचनामे करतात .

याच प्रमाणे नैसर्गिक आपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पशुंची हानी झाली असेल अशावेळी स्थानिक तलाठी ग्रामसेवक सोबत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांचे पथक गठित करण्यात येते. गावाशिवारात नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांची पडझड झाली असेल अशावेळी स्थानिक तलाठी , ग्रामसेवक , सरपंच किंवा पोलीस पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी किंवा अभियंता हे नुकसानीची पातळी पाहून पंचनामे करतात .

बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तीमध्ये विद्युत विभागाचेही मोठे नुकसान होते अशावेळी त्या त्या गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महावितरणचा अधिकारी ,तलाठी ग्रामसेवक यांचे पथक गठित करण्यात येते . ही सर्व पथके पंचनामे झाल्यावर अहवाल तहसीलदार यांच्याकडे देत असतात . याबाबतची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवरून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पशुधनाची हानी झाली असेल तर ?

नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाची हानी झाली असेल तर संबंधित शेतकरी तहसील विभागाला माहिती देऊन नुकसान भरपाई मिळवू शकतात .अशा प्रकारची नुकसान भरपाई तालुकास्तरावर तहसीलदार यांना देण्याचा अधिकार आहे .नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांने झालेल्या पशुधन हानीचा पंचनामा व पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरने केलेला शवविच्छेदन अहवाल तहसीलला सादर करणे आवश्यक आहे .यामध्ये निकषाप्रमाणे आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!