हॅलो कृषी ऑनलाईन : एकरकमी एफआरपीच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रम झालेले पहायला मिळाले. स्वाभिमानीच्या वतीने आज सांगली जिल्ह्यतल्या कारखान्यांवर धडक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे या रॅलीच्या अध्यक्षस्थानी होते.
दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय, मापात पाप नको वजनात चोरी नको, एकरकमी FRP जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. उदगिरी कारखान्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कारखण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. यावेळी या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतो असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगतिले आहे. उदगिरी कारखान्यापासून पुढे रॅली विराज खंडसारीवर गेली. तिथेही निवेदन देऊन याच मागण्यासंदर्भात चर्चा केली. तिथून रॅली क्रांती कारखान्यावर आली. त्या ठिकाणी आदोलकांसमोर खराडे यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर सोनहिरा साखर कारखान्यावर रॅली काढण्यात आली. त्याठिकाणी रॅलीची सांगता झाली.
जिल्ह्यात दत्त इंडिया वगळता कोणत्याही कारखान्यानं एकरकमी FRP जाहीर केली नाही. शनिवारी (5 नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजता सर्वोदय कारखान्यावरुन रॅलीला सुरुवात होणार आहे. तिथून हुतात्मा वाळवा, राजाराम बापू साखरालेमार्गे विश्वास चिखली तसेच नीनाई कोकरुड कारखान्यावर रॅली जाणार आहे. तिथे रॅलीची सांगता होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुंताश कारखान्यांनी एकरकमी FRP जाहीर केली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया वगळता कोणत्याही कारखान्यानं एकरकमी FRP जाहीर केलेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांना जे जमते ते सांगली जिल्ह्यात का जमत नाही? असा सवालही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. या रॅलीत राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी एक दिवस खर्च करावा. जेवढे शेतकरी मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी होतील, तेवढा जास्त दबाव कारखांनदारांवर निर्माण होईल. तरच कारखानदार झुकतील अन्यथा, त्यांचा मनमानी कारभार सुरुच ठेवतील. शेतकऱ्यांनी येताना चटणी-भाकरी घेवून यावं असे आवाहन यावेळी महेश खराडे यांनी केलं आहे.
काय आहेत मागण्या ?
–एकरकमी FRP तातडीनं जाहीर करावी.
–कोणीही कुटूनही वजन करुन आणल्यास ऊस गाळप केला जाईल असे जाहीर करावं
— बामणी, मंगरुळ करवे, धामणी, पाडली, नरसेवाडी, कचरेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर आदी गावात लवकर टोळ्या द्याव्यात,
–कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळं द्राक्ष बागा आणि अन्य पिकांचं नुकसान होते आहे. त्यामुळं राखेचा बंदोबस्त करावा.
–तोडीणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, ते बंद झाले पाहिजेत.
–ऊसाच्या वजनातील काटामारी थांबवावी. 13 ते 14 टक्के काटामारी होते. ती बंद झाली पाहिजे.