आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे.

याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर सन 2022 पर्यंत कार्यरत होईल. हाच सुपर कम्प्युटर बदलत्या आणि तीव्र हवामानात परिस्थितीबद्दल अचूक अंदाज वर्तवेल त्याचबरोबर वादळ, पुर, बर्फवृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांपासून जीवित हानी टाळण्यात मदत करेल.

याबाबत बोलताना हवामान खात्याचे ब्रिटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेन्ने अँडरसबी यांनी सांगितलं की, सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि आम्ही एकत्र काम करत आहोत यासाठी एकत्रितपणे हवामानाचे आतापर्यंतचे अंदाज आणि आकडेवारी संकलित करीत आहोत. त्याच अनुषंगाने सखोल अभ्यास करून सुपर कम्प्युटरच्या आधारे पुढील काळात हवामान बाबत अचूक भविष्यवाणी केली जाणार आहे. अशा प्रकारची भविष्यवाणी आणि अलर्ट वरूनच लोकांना सुरक्षित राहून बाहेर न जाण्याचा इशारा देण्यात येईल. दरम्यान यासाठी ब्रिटन सरकार तब्बल 12 हजार चारशे कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी पुरवणार असल्याची घोषणा केली होती. हा सुपर कम्प्युटर जगभरातील आघाडीच्या 25 शक्तिशाली सुपर कम्प्युटर पैकी एक असेल असा दावा केला जात आहे.

दरम्यान या सुपर कम्प्युटरचा वापर केवळ हवामान अंदाज वर्तवण्यासाठी नाही तर प्रगत हवामान बदलांचा मॉडेलिंगसाठी या कम्प्युटर डिवाइस चा वापर केला जाणार आहे. सुपर कम्प्युटर हवाई वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या हवा आणि तापमानाच्या परिस्थितीबाबत आधीच अचूक अंदाज वर्तवेल. या सुपर कम्प्युटरच्या मदतीने वादळ, अतिवृष्टी आणि पूर टाळण्यासाठी आपात्कालीन तयारी करण्यास मोठी मदत होईल. असे सांगण्यात येत आहे. हवामानाच्या पूर्वानुमान यासाठी प्रथम सुपर कम्प्युटर वापरला जात आहे असे नाही. जपानमध्ये आधीपासूनच असा कम्प्युटर आहे. या कम्प्युटरचे नाव ‘फुगाकू’ असून सुनामीमुळे येणाऱ्या पुराच्या भविष्यवाणी साठी या कम्प्युटरचा वापर केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!