आता सातबाऱ्यावर असणार पत्नीचेही नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
हॅलो कृषी ऑनलाईन । ८  मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सबलीकरणाचे विविध उपक्रम जगभरात राबविले जातात. या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. त्यातीलच शेत दोघांचे या योजनेअंतर्गत आता सातबारा (7/12) उताऱ्यावर केवळ पतीचे नाव असणार नाही तर जोडीला पत्नीचेही नाव लावले जाणार आहे. काल (गुरुवार) या योजनेची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
महिलांच्या कार्याचा विशेष गौरव या दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी केला जातो. त्यांचे शिक्षण, सक्षमीकरण आणि सबलीकरण यासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मंत्री हसन मुश्रीफ यांनी घर दोघांचे या योजनेंतर्गत ८ अ उताऱ्यावर आणि शेत दोघांचे या योजनेंतर्गत सातबारा उताऱ्यावर पत्नीचेही नाव लावले जाईल अशी माहिती दिली आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना आखल्या गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील महिला बचतगटांनी बनविलेले पदार्थ तसेच वस्तू यांची मॉलमध्ये विक्री करता यावी यासाठी संधी निर्माण केल्या जाणार आहेत. महिलांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणांचे आयोजन केले जाणार आहे. महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्या आहारासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी महिलांसाठीच्या कायद्याची माहिती विस्तृतपणे देण्यासाठीची आखणी केली जाणार आहे. असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!