प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देणार एक शेळी : मंत्री सुनील केदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यात पोहरा येथे गोट ब्रिडींग फार्म २५० एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर रामटेक तालुक्यात गोट ब्रिडींग फार्म तयार करण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी कुटुंबाला १ शेळी मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.या कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. १५) स्व. वसंतराव नाईक सभागृह (वनामती) येथे करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेद्वारे उपक्रम

यावेळी बोलताना केदार म्हणाले, की ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळित झाली असून तिचे बळकटीकरण करण्यासाठी शेती उद्योगावर भर देत शेळी व दुधाळ जनावरांच्या पूरक व्यवसायावर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. यावर चिंतन व मनन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेद्वारे शेळी गट व दुधाळ जनावरे वाटप कार्यक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत असून हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीला ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले. आधुनिक काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यासाठी या कार्यशाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशिक येथील शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी सभापतींनी भेट देऊन तेथील कार्यपद्धती जाणून घ्यावी व त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्गदर्शक दीपक झंवर, अमिताभ मेश्राम, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, कृषी विकास अधिकारी जयंत कऊटकर, किशोर बोराटणे उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!