लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव ,खटाव मध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू ; जाणून घ्या, काय घ्याल काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

दरम्यान बेडग परिसरातील लाळ्या खुरकत रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरण करणे आवश्यक होते परंतु मागील कित्येक महिन्यांपासून तेथील जनावरांना पशुवैद्यकीय विभागाकडून दुर्लक्ष असून कोणत्याही प्रकारचे लसीकरण केलेले नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण तातडीने करण्याची मागणी आता होत आहे. बेडग, आरग परिसरात लाळ्या खुरकत रोगाने अजूनही मृत्यू होतच आहेत, लसीकरण अजून पूर्ण झालेले नाही.

बेडग मध्ये लसीकरण न केल्याने कालच पुन्हा दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता खटाव परिसरात मेंढ्यांच्या मृत्यूने पशु पालकातून भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाणी पिल्याने जनावरांचा मृत्यू झाला असून यावर उपाययोजना सुरू असल्याचे लिंगनूरचे पशु पर्यवेक्षक शेखंडे यांनी सांगितले. पशुवैद्यकीय विभागाकडून वेळीच लसीकरण केले असते तर मृत्यू झाले नसते. आता तरी तत्काळ योग्य लसीकरण करणे आवश्यक असून याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.

रोगाची लक्षणे

1) सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व चारा खाल्ल्याने होतो.

२) रोगाची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

३) पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

रोगावरील उपाय

1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.

2) आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.

3) आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.

4) दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी.

5) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात जनावरांना द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!