कांद्याला प्रतिकिलो 25 रुपयांचा दर द्या, अन्यथा कांदा विक्री बंद; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला मिळणार कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. शिवाय केंद्र सरकार देखील ठोस भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केलं आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. हा दर जर मिळाला नाहीतर 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करु असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

सरकारचे शेतकऱ्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष

कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढल्यावर तत्काळ एका दिवसात कांदा निर्यातबंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, कांदा व्यापाऱ्यावरती धाडी टाकणे, कांदा साठ्यावर मर्यादा घालणे अशा विविध क्लुप्त्या वापरुन कांद्याचे दर पाडले जातात. मात्र, आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावानं विकला जात आहे. अशा वेळी सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिघोळे यांनी म्हटलं आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे.

नाफेडने जखमेवर मीठ चोळले

एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना यावर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला. परंतू, नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा 10 ते 12 रुपये प्रति किलो याप्रमाणे खरेदी करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला 20 ते 22 रुपये येत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून कांद्याला मिळणारा सरासरी दर हा 8 ते 10 रुपये इतका कमी आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी 25 रुपये प्रति किलोचा दर मिळावा अन्यथा येत्या 16 ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिला आहे. .शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी 25 रुपये दर मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भारत दिघोळे यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!