‘या’ औषधी वनस्पतीची लागवड करा आणि कमी खर्चात १ ते २ लाखांचा नफा मिळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सर्पगंधा ही वनस्पती वनौषधी झुडूप असून, साधारण ६० ते ९० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते.सर्पगंधा ही वनस्पती भारतात हिमालयातील सिमल्यापासून आसाम, त्रिपुरापर्यंत तसेच गंगेचे खोरे, बिहार, बंगाल, ओरिसा, नेपाळ, सिक्कीम. भूतान, अंदमान इत्यादी भागांतील जंगलांत आणि महाराष्ट्रात कोकण, पश्चिम घाट व विदर्भात आढळते.

या वनस्पतीच्या खोडावरील साल पिवळसर असते. पाने साधी, लांबट आकाराची, तीन तीनच्या समूहात असतात. पानांचा रंग वरून गर्द हिरवा, तर खालून फिक्कट हिरवा असतो. मुळे सापासारखी लांब, जाड असून, मुळाची साल फिक्कट उदी रंगाची असते. फुलांचा रंग तांबडट-पांढरा असून फुलांचा गुच्छ शेंड्यावर किंवा पानांच्या बेचक्यात येतो. फुले लहान, पांढरी किंवा तांबडटसर असतात. फुलाचे डेखे लालभडक असतात. फळे वाटाण्याएवढी, काळसर जांभळ्या रंगाची असून, मांसल व कठीण कवचाची असतात. बिया, खोड व मुळापासून हिची लागवड करता येते.

सर्पगंधाचे उपयोग

सर्पगंधा वनस्पतीच्या मुहीळापासून अजमालाईन, सर्पेन्टाईन, रॉऊलफाईन, रेसरपीन ही महत्त्वाची अल्कलॉईड्‌ज मिळवली जातात. यापैकी रेसरपीन हा औषधगट रक्तदाब कमी करण्यासाठी वापरला जातो. नव्‍‌र्हस सिस्टमवर ही औषधे गुणकारी आहेत. वेड्या, भ्रमिष्ट लोकांसाठी औषध म्हणून या वनस्पतीचा वापर होत असल्याने या वनस्पतीला ‘पागल की दवा’ असेही म्हणतात. तसेच मासिक पाळी वेळेवर व योग्य प्रमाणात येण्यास मुळांचा वापर करतात. सर्पदंश झाल्यास मुळाचा लेप जखमेवर लावतात. सर्पगंधेस जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे.

सर्पगंधापासून बनवलेल्या औषधांत या वनस्पतीच्या सुकवलेल्या मुळ्यांचा उपयोग होतो. मुळ्यांपासून मिळवलेली अर्कद्रव्ये ही अपस्मार (epilepsy), चित्तविकृती (psychosis), निद्रानाश (insomnia), छिन्‍नमनस्कता (schizophrenia) आणि आंतड्यांच्या काही विकारांवर गुणकारी आहेत. पटकी, उदरशूल (colic) व ताप आदींवर सर्पगंधाच्या मुळांचा अर्क इतर वनस्पतींच्या अर्कांत मिसळून वापरतात. अर्भकाच्या जन्मावेळी मातेला वेणा येण्यासाठीही सर्पगंधा उपयोगी पडते. डोळ्यांच्या बुबुळावरील पारदर्शक पडदा अपारदर्शक होऊ लागल्यास सर्पगंधाच्या पानांच्या रसाचा उपाय करतात.

लागवड

सर्पगंधा च्या लागवडीचा कालावधी 18 ते 24 महिने तर तापमान जास्तीत जास्त 40 अंश सेल्सिअस पर्यंत चालते. यासाठी जमीन पाण्याचा निचरा होणारी तर चुनखडीचे प्रमाण कमी असावे लागते. या पिकाची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करावी. दोन पद्धतीने याची लागवड करता येते बियाणे आणि मुळे पद्धतीने.

1)बियाणे – मे महिन्यात नर्सरी तयार करून घ्यावी एकरी चार किलो बियाणे घ्यावे एकरी 35 ते 40 हजार रोपे तयार करावेत. ज्या क्षेत्रात नर्सरी तयार करायची आहे त्या क्षेत्रात दहा बाय दहा चे बेड तयार करून घ्यावेत. त्यावर शेणखत मिक्स करून त्यावर बियाणे पेरावे. अंदाजे 20 ते 40 दिवसांच्या आत रोपांची उगवण व्हायला सुरुवात होते. त्यानंतर रोपांची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात शेतामध्ये करा. लागवड करताना दोन रोपांतील अंतर एक फूट किंवा दोन फूट इतके ठेवावे.

2) मुळांपासून लागवड करणे.

त्याकरिता या वनस्पतीची पाच सेंटीमीटर लांबी ची मुळे वापरावीत. त्याची लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पावसाळ्यात करावी.

पाणी व्यवस्थापन

सर्पगंधा या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी सतत पाण्याची गरज नसते. त्यामुळे ड्रिप एरीकेशन चा वापर करावा. दर पंधरा दिवसांनी हवामानानुसार पाण्याचे व्यवस्थापन रोपांना करावे. ही गोष्ट लक्षात ठेवा की पावसाच्या पाण्याचा निचरा सहज गतीने त्या जमीनीतून झाला पाहिजे.

खत व्यवस्थापन

तसे पाहायला गेले तर औषधी वनस्पतींना विशेष अशा खतांची गरज नसते मात्र व्यावसायिकरित्या तुम्ही त्याची लागवड करत असाल तर मात्र प्रति एकरी नायट्रोजन 8 किलो, (युरिया 18 किलो) फॉस्फरस १२ किलो (सिंगल सुपर फॉस्फेट, 75 किलो), १२ किलो (म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो) टाकावे. त्यानंतर सर्पगंधा च्या वाढीच्या काळात आठ किलो नायट्रोजनची मात्रा द्यावी. तसेच शेतात जास्त पाणी झाल्यास किंवा पाण्यामुळे मुळांना बुरशी येऊ लागल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनी करावा.

कीड आणि रोग व्यवस्थापन

या पिकावर पांढरी बुरशी पडते त्याकरिता फाईटोक्लोर किंवा
मेरिस्टन 3%. तसेच पाने जाळला्यासारखी दिसल्यास डायथेन Z 78 फवारावे

काढणी

या पिकाची काढणी 18 महिन्यांनी केव्हाही करू शकता. काढणी करण्या अगोदर पाणी देऊन जमीन ओली करून घ्यावी. त्यानंतर रोपांची काढणी करावी. रोपांची काढणी केल्यानंतर मुळांचे 12 ते 15 सेंटिमीटर लांबीचे तुकडे करून वाळण्यास ठेवावेत.

उत्पादन आणि बाजारभाव

सर्पगंधा या औषधी मुळाच्या सुकलेल्या उत्पादन आणि बाजारभाव बाबत माहिती घेऊया. सुकलेल्या मुळांचे सात ते नऊ क्विंटल उत्पादन होते. आणि त्यांचा बाजार भाव हा जवळपास 150 ते 300 रुपये प्रति किलो इतका आहे. तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत अंदाजे 10 ते 30 किलोपर्यंत बियाणे देखील मिळते. अशाप्रकारे आपण सर्पगंधा या औषधी वनस्पतीचे लागवड करून एकरी 1 ते 2 लाख रुपये उत्पादन घेऊ शकतो.

 

Leave a Comment

error: Content is protected !!