Groundnut Cultivation : यंदाच्या खरिपात भुईमूग लागवड करताय ? मग हा लेख वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, प्रमुख तेलबिया उत्पादनापैकी भुईमुगाची लागवड (Groundnut Cultivation) राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात २.३६ लाख एवढ्या क्षेत्रावर भुईमूग लागवड केली जाते. आजच्या लेखात आपण भुईमूग लागवडीची सर्व माहिती घेऊया…

जमीन आणि पूर्व मशागत

भुईमूग लागवडीकरिता मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

पेरणीची वेळ

खरीप हंगामात भुईमुगाची पेरणी – १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी. उन्हाळी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, पेरणीचे वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

सुधारित वाण

एस.बी -१२, जे.एल- २४ (फुलेप्रगती),टी.अे.जी – २४, जे.एल. २२० (फुले व्यास), जे.एल. २८६ (फुले उनप), टी.पी.जी.-४१, टी.जी. – २६, जे.एल. ५०१, फुले आरएचआरजी – ६०२१,

बियाणे


भुईमूगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे वापरावे. १०० किलो : एसबी – ११, टीएजी – २४, टीजी – २६, जेएल – ५०१, फुले ६०२१ , १२० ते १२५ किलो फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी – ४१, फुले उनप, फुले उन्नती.

बीजप्रक्रिया

बियाण्यापासून प्रादुर्भाव होणा-या व रोपावस्थेत येणा-या रोगापासून पिकाचे संरक्षण (Groundnut Cultivation) करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डेंझिम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकून पेरावे.

खत मात्रा

पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. खत व्यवस्थापन (सुधारित शिफारशीनुसार २०१३) भुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० क्वि/हे (२०० क्विं/हे पेरणीवेळी तर उर्वरीत २०० क्विं/हे आ-या सुटतांना) जमिनीत मिसळुन द्यावे. उन्हाळी भुईमूगासाठी नत्र व स्फुरद बरोबर २५० किलो जिप्सम १.२५ किलो पेरणीवेळी व १२५ किलो आ-या सुटण्याच्या वेळी) द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास (Groundnut Cultivation) मातीची भर मिळते. भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पेंडीमिथॉलिन १.०० किलो क्रि. हा प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी इमॅझिथायपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि. हा/हे. (७५० मिली व्यापारी उत्पादन/हे) ५०० लिटर पाण्यातून द्यावे.

पाणी व्यवस्थापन

खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित (Groundnut Cultivation) पाण्याची पाळी द्यावी. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.

पीक सरंक्षण


फुलकिडे, तुडतुडे – नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी – नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस
२५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
टिक्का व तांबेरा – रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन

पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे (Groundnut Cultivation) टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!