अस्मानी, सुलतानी संकट कमी की काय, म्हणून आता पोल्ट्री असोसिएशन सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज ना उद्या… सोयाबीनला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीन उत्पादकांनी काही प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली आहे. संपूर्ण राज्यभरातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा केली जात आहेअसं असताना दुसरीकडे मात्र ‘ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन’ ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल असायला पाहिजे असे म्हणत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय…

या पत्रात सोयाबीनला प्रति क्विंटल 2950 रुपये हमी भाव आहे. परंतु बाजारात सध्या सोयाबीनला 6000 ते 6200 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल असायला पाहिजेत म्हणून केंद्र सरकारने सोयाबीनमधील दरवाढ रोखण्यासाठी पावले उचलावीत असं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी पेचात अडकलेल्या शेतकऱ्याला आणखीनच पिचण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उठवला जात आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाचक मागण्या

१) सोयाबीनचा दर जास्तीत जास्त 4000 रुपये असावा.
२) सोया पेंड आयातीला 31 मार्च 2022 पर्यंत मुदत द्यावी
३)सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालावी
४)सोयाबीन व्यापाऱ्यांना साठा मर्यादा घालून द्यावी

दरम्यान ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडस असोसिएशन यापूर्वी जीएम सोया पेंड आयातीसाठी केंद्र सरकारकडून जोरदार पाठपुरावा केला होता या संघटनेच्या लॉबिंग म्हणून केंद्र सरकारने बारा लाख टन सोया पेंड आयात करण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजारात येण्याच्या सुमारास म्हणजे ऐन हंगामात आयात सोयाबीन भारतात दाखल झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव घटले. सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने दर टिकून आहेत पण माल रोखून धरला तर पुढील काळात सोयाबीनला चांगला दर मिळेल हे सूत्र पकडून शेतकरी व्यवहार करतात. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाने आता सरकार दरबारी असलेलं आपलं वजन खर्च करण्यासाठी कंबर कसली आहे…

काय आहे पत्रात

सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपये या पातळीवर स्थिर होतील म्हणजेच सोया पेंड 3800 ते 4000 रुपये दराने उपलब्ध होईल अशी आमची अपेक्षा होती. परंतु सध्या सोयाबीनचे दर हे पाच हजार रुपयांच्या घरात आहेत. मागील वर्षी स्टॉकिस्ट आणि स्पेक्युलटरस यांनी एनसीडीईएक्‍स या कमोडिटी एक्सचेंज वर सोयाबीनचे वायदे आणि स्टॉक करून सोयाबीनच्या दरात तेजी आणली. यंदाही ते हाच कित्ता गिरवत असल्यामुळे सध्या सोयाबीनचे दर हे 6000 ते 6200 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सोया पेंड महाग होऊन पोल्ट्री उद्योगावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोयाबीनमधील दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोया पेंड आयातीला 31 मार्च 2022 पर्यंत मुदत द्यावी. सोयाबीनचे वायदे बाजारावर बंदी घालावी आणि सोयाबीनला साठा मर्यादा म्हणजे स्टॉक लिमिट करावी. अशी मागणी आम्ही करत आहोत अशा आशयाचं पत्र या असोसिएशनने लिहिले आहे.

तर शेतकरी केंद्र सरकारला धडा शिकवतील…

आस्मानी आणि सुलतानी संकटांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी आधीच मेटाकुटीस आला आहे. अशा स्थितीमध्ये ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडस असोसिएशनने सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा जास्त असल्याचे कारण देत हे भाव जास्तीत जास्त ४००० रुपयांवर स्थिर ठेवण्याची मागणी केली आहे. जी शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळत असताना याच असोसिएशन ने यापूर्वी सोया पेंड आयातीसाठी केंद्र सरकारकडून जोरदार पाठपुरावा केला होता आणि त्यानुसार केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता सोयपेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आणि सोयाबीनच्या दरात घासणं झाली. मागील अनुभव लक्षात घेता जर केंद्र सरकारने यावेळी शेतकऱ्यांचा विचार न करता निर्णय घेतला तर शेतकरी केंद्र सरकारला धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया किसान काँग्रेसच्या हनुमंत पवार यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, पोल्ट्री धारकांनी ही बाब देखील लक्षात ठेवली पाहिजे की, जर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादन घेणे कमी केले तर पोल्ट्री धारकांना सोयाबीन आयात करून घ्यावे लागेल. जे त्यांच्यासाठी अधिक खर्चिक होईल.

 

Leave a Comment

error: Content is protected !!