घराच्या घरी तयार करा विद्राव्य कॅल्शियम ;पिकाच्या प्रजोत्पादक कालात ठरते संजीवनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कॅल्शियम जसे मानवी शरीराकरिता महत्वाचे असते त्याचप्रमाणे पिकांकरिता देखील महत्वाचे असते. आजच्या लेखात घराच्या घरी विद्राव्य कॅल्शियम कसे तयार करावे याची माहिती जाणून घेऊया

साहित्य

  • अंड्याची टरफले / शंख शिंपले
  • व्हिनेगर
  • खलबत्ता
  • द्रावण बनविण्यासाठी पात्र प्लास्टिक किंवा काचेचे (किती प्रमाणात बनवणार आहात त्यानुसार योग्य आकाराचे).
  • स्वच्छ सछिद्र कापड किंवा कागद (पात्राच्या तोंडावर झाकण्यासाठी).
  • रबर बॅंड अथवा दोरी. पात्राच्या तोंडाला बांधण्यासाठी.
  • खलबत्ता

भारतामधे स्वयंपाकात सर्रास वापरला जाणारा व्हिनेगर हा द्रव पदार्थ म्हणजे फळे किंवा फळांच्या रसात खमीर (यीस्ट) मिसळून किण्वन प्रक्रियेने तयार होणारा आंबट आम्लधर्मीय द्रव पदार्थ आहे. शहरी भागात यास व्हिनेगर तर बऱ्याच भागात यास सिरका किंवा शिरका असेही म्हणतात. आम्लधर्मीय गुणधर्मामुळे हा उत्तम द्रावक (विरघळवून घेणारा) आहे. अंड्याची टरफले व शंख शिंपले यातील कॅल्शीयम विरघळून घेण्यासाठी याचा वापर केलेला आहे. व्हिनेगर हे सहजासहजी उपलब्ध होते. विशेषत: लोणची, पापड, मसाले विक्रेत्यांकडे हे उपलब्ध असते. सफरचंदापासून बनवलेले ऍपल व्हिनेगर, तांदुळापसून बनवलेले राईस व्हिनेगर अशा विविध प्रकारात हे उपलब्ध आहे.
वरील साहित्यातील विनेगर हा एकमेव घटक बाजारातून विकत घ्यावा लागणारा व काहीसा खर्चिक आहे. परंतु या निविष्टेचे परीणाम व उपयुक्तता पाहता हा खर्च नगण्य आहे.

कसे बनवावे

अंड्याच्या टरफलाच्या आतील बाजूचा पापुद्र्यासारखा भाग काढून टाका. यामुळे कॅल्शियम व्यतिरीक्त कोणताही घटक शिल्लक राहाणार नाही. अंड्याची टरफले किंवा शंख शिंपले खलबत्त्यात कुटुन बारीक तुकडे करा (भुकटी करू नये). तुकडे केल्याने अभिक्रिया वेगाने होते. कुटलेले तुकडे तव्यावर हलके भाजून घ्या, ज्यामुळे या तुकडांवर चिकटलेले अनावश्यक जैविक पदार्थ नष्ट होतील.
पात्रात व्हिनेगर घेऊन त्यात अंड्याची टरफले किंवा शंख शिंपल्याचे तुकडे हळूहळू सोडा. व्हिनेगर संपर्कात येताच हे तुकडे बुडबुडे उत्सर्जित करायला सुरवात करतील व पात्रात वरखाली होतील. हळूहळू सोडण्याचा उद्देश असा की सर्व तुकडे व्हिनेगर मधे एकत्र टाकल्यास द्रावण फेसाळून पात्रातून उतू जाण्याची शक्यता असते. टरफले व शिंपले विनेगर मधे फेसाळून हळूहळू विरघळतील. या प्रक्रियेस २ ते ३ दिवस लागू शकतात. यादरम्यान पात्राच्या तोंडाला स्वच्छ कापड किंवा कागद रबर बँड अथवा दोरीने बांधून सामान्य तापमान व सावलीच्या ठिकाणी ठेवावे व रोज निरीक्षण करावे. जेंव्हा या द्रावणात टरफले किंवा शिंपले टाकल्या नंतरही ते फेसाळले नाहीत याचा अर्थ या द्रावणात आता आणखी कॅल्शियम विरघळण्याची सामावून घेण्याची शक्यता नाही व कॅल्शियम संपृक्त (saturated) द्रावण तयार आहे.

कसे वापरावे

हे द्रावण पिकावर केवळ फवारणी साठी वापरायचे आहे. फवारणीसाठी १ लिटर पाण्यात १ मिली विद्राव्य कॅल्शियम मिसळावे. विद्राव्य कॅल्शियम फॉस्फेट, फरमेंटेड प्लांट ज्युस(FPJ), किवा जडीबूटी संजीवक (OHN) यांबरोबर पाण्यात मिसळून फवारणी केली जाऊ शकते.

प्राथमिक अवस्थेत पिकाची कमजोर शारीरीक वाढ, पाने रंगहीन होणे व चकाकी नसणे, फुलांचा बहर कमजोर होऊन फुलगळ होणे, केवळ शाखीय वाढ होऊन फळांची वाढ न होणे, फळांमधे शर्करेचे (साखर) प्रमाण कमी असणे, अशा अवस्थेत विद्राव्य कॅल्शियमची फवारणी अत्यंत लाभदायक आहे. फुलांचा बहर व फळधारणेच्या काळात फवारणीने शाखीय वाढ थांबून उपलब्ध अन्नद्रव्य केवळ फुले व फळांच्या वाढीसाठी उपलब्ध केले जाते. परीणामी फळ उत्पादनात लक्षणीय वाढ होते. विद्राव्य कॅल्शियम फॉस्फेट, फरमेंटेड प्लांट ज्युस(FPJ), किवा जडीबूटी संजीवक (OHN) यांबरोबर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फळांच्या रंग, चव व सुगंध यात अप्रतिम परीणाम दिसून येतात.

महत्वाचे :-
जेंव्हा पिकाची शाखीय वाढ आवश्यक आहे, अशा कालावधीत विद्राव्य कॅल्शीयमची फवारणी करू नये.

शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८

Leave a Comment

error: Content is protected !!