परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी नंतर मागील पाच सहा दिवसापासून शेतजमिनी वापसा वर येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी पेरणीच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रब्बी पेरणीस सुरुवात झाली आहे. शेतात पारंपारिकबैल तिफन जागी ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र यांचा राबता असे चित्र सध्या दिसत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने रब्बीतील ज्वारी, हरभरा सह तृणधान्य व कडधान्य पिकांच्या लागवडीमध्ये काही प्रमाणात घट येणार असून शेतकरी बागायती पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी सर्वच मोठ्या व लघू प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने व जायकवाडी धरण शंभर टक्के भरले असल्याने रब्बी हंगामात सिंचनासाठी सोय झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम चांगला पिकेल व त्यातून चांगले अर्थकारण होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरी 2 लाख 15 हजार 961 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी 1 लाख 16 हजार 419 हेक्टरवर तर गहू 28 हजार 571 हेक्टर क्षेत्रावर व त्या पाठोपाठ मका 2 हजार 628 हेक्‍टरवर पेरणी होईल असे अपेक्षित आहे.

याशिवाय हरभरा 63 हजार 363 हेक्टर तर करडई 3 हजार 494 हेक्टर क्षेत्रावर शेतकरी पेरणी करतील असे अपेक्षित आहे .पाठोपाठ जवस 116 हेक्टर ,तीळ 17 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होईल असे कृषी विभागाकडून कृषी अहवालामध्ये प्रस्तावित आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर खरिपातील सोयाबीन काढणी व कापूस वेचणी मध्ये शेतकरी गुंतला आहे. सोयाबीन व कापूस पिकाचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झालेले असताना शेतकऱ्याला मात्र येत्या रब्बी हंगामात कडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळेच नव्या जोमाने तो कामाला लागला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!