राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज ; कशी घ्याल वावरातल्या पिकांची काळजी ? कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या हवामान अंदाजानुसार आजपासून राज्यातल्या काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. दिनांक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान विदर्भ , मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र या भागात वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. अशा स्थितीत सध्या वावरात असलेल्या रब्बी पिकांच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस : कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

रब्बी ज्वारी: रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्बी सूर्यफूल: रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई : करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा : घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % – ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० % – ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी: बागेत झाडांना काठीने आधार द्यावा. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा : आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

द्राक्ष : बागेत डाऊनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्षाची घडे जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावी.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Leave a Comment

error: Content is protected !!