17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता; पीक व्यवस्थापनात करा हे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतातील पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे ? जाणून घेऊया … महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार भात, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद पिकामध्ये पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे.

— घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने फवारणी पुढे ढकलावी किंवा पावसाचा अंदाज बघून पिकावर कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकांची फवारणी करावी.
— शेतात साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध पिकात योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
–पिकांमध्ये अंतर मशागत करण्यासाठी योग्य परिस्थिती असल्यास लोखंडी कोळप्याने कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रणास मदत होईल आणि जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्यासाठी पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही.

भात : भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून भात खाचरातील बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. जेणेकरून किडीच्या खाद्य वनस्पतींचा समूळ नायनाट होईल. ढगाळ वातावरण व अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे भात पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल (७५ टक्के) पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे प्राथमिक अवस्थेत आहे त्या ठिकाणी दोन ते तीन सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एस एल) १२५ मिली किंवा फीप्रोनील (८ टक्के एससी) १५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी करावी.

सोयाबीन : सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामानामुळे पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस सी) २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये हेक्टरी पाच स्पोडोल्यूर चा वापर करून फेरमोन सापळे लावावेत. शक्य असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

मका : पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. ढगाळ व दमट हवामानामुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा दहा टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी स्पिनेटोरम (११.७ टक्के एस सी) ५ मिली किंवा थायामिथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुर: पिक सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. तुर पिक ४५ दिवसांचे झाल्यानंतर शेंडे पाच सेंटीमीटर वरून खुडावेत. आवश्यकतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी.

मूग उडीद : पिकामध्ये रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी २ मिली इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के ईसी) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी गरजेनुसार खुरपणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!