राज्यात जोरदार पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ;शेतकरी चिंतेत रब्बीसह फळबागांना धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (1) राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पुण्यामध्ये 75 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज देखील राज्यातल्या अनेक भागात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 3-4 तासात या भागात पाऊस

हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्‍यता आहे.

‘जोवाड’ चक्रीवादळाचा इशारा

एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता ‘जोवाड’ चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकरी चिंतेत

ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरलीये . सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!