रस्त्याच्या कडेला टोमाटोचा लाल चिखल ; शेतकऱ्यांना मिळतोय अवघा 2-3 रुपये भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव न मिळाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. आता तिच अवस्था राज्यातल्या टोमॅटो उत्पदक शेतकऱ्यांवर आली आहे. लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे घेतलेले उत्पादन अवघ्या १-२ रुपयांना विकावं लागत आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

महाराष्ट्रातील औरंगाबाद पैठण बाजारात योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ट्रॉलीभर टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकले. महाराष्ट्रात यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले झाले आहे, परंतु त्याला याोग्य दर नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. दिल्लीत टोमॅटोचा दर 40 रुपये किलो आहे तर महाराष्ट्रात टोमॅटोला शेतकऱ्यांना फक्त 2-3 रुपये मिळत आहेत. मध्यस्थ आणि किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांकडून कमी किमतीला खरेदी करत असल्याचं चित्र आहे

याबाबत बोलताना अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष राम गाडगीळ म्हणाले, आज टोमॅटो पिकवणारे शेतकरी प्रचंड तोट्यात आहेत. उत्पादन जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती आहे. टोमॅटो हे नाशवंत पीक असून शेतकऱ्यांना ते साठवण्याची व्यवस्था उपलब्ध नसते. नवी दिल्ली सारख्या ठिकामी टोमॅटो किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. शेतकऱ्यांना एका किलोला केवळ 2 ते 3 रुपये मिळत असल्यानं खरा फायदा मध्यस्थांना मिळत आहे.

गोविंद श्रीरंग गीते हे औरंगाबाद येथील शेतकरी आहेत. ते म्हणाले, “आम्ही सध्या 5 रुपये कॅरेटला टोमॅटो विकत आहोत. एक एकर टोमॅटो शेतीसाठी त्यांनी किमान एक लाख रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं. उत्पादन खर्चही निघत नसल्याचं गीते यांनी सांगितलं आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारनं करावी, अन्यथा शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय अन्य मार्ग राहणार नसल्याचं गीते म्हणाले.

दिल्लीच्या आझादपूर मंडईमध्येही टोमॅटोचा किमान दर 3.25 रुपये प्रति किलो झाला आहे. तर येथे कमाल किंमत 22 रुपये प्रति किलो आहे. राष्ट्रीय कृषी बाजारात अर्थात ऑनलाईन मंडी (ई-नाम) मध्ये सुद्धा त्याची मॉडेल किंमत फक्त 600 रुपये प्रति क्विंटल आहे. टोमॅटो हे बागायती पीक आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!