श्री रेणुका शुगर्स कडून 350 रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; मराठवाड्यात सर्वाधिक दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये विभागामध्ये सर्वाधिक दर श्री रेणुका शुगर साखर कारखान्याने 350 रुपये प्रतिटन प्रमाणे सुमारे 11 कोटी 36 लाख रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली असून साखर कारखाना प्रशासनाकडून ही दुजोरा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागात येणाऱ्या गावांतील स्थानिक शेतकऱ्यांसाठी श्री रेणुका शुगर साखर कारखाना आर्थिक गंगाजळीचा कणा ठरला आहे.

११.७१ साखर उतारा आल्यामुळे यंदा मराठवाड्यातील सर्वाधिक दर देणारा साखर कारखाना असा एफआरपीप्रमाणे 2 हजार 697 रुपयाचा सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याला नावलौकिक मिळाला आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये साखर कारखान्याने उपविभागात येणाऱ्या पाथरी मानवत व सेलू या तालुक्यातील शेतकऱ्यांचा 3 लाख 24 हजार 795 मे.टन ऊस गाळप केला आहे.

यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक 92 टक्के मानवत 5 टक्के तर सेलू तालुक्यातून 3 टक्के ऊस गाळपासाठी आणण्यात आला होता. मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सदरील साखर कारखान्याने 2 हजार 248 शेतकऱ्यांच्या खात्यावर 350 रुपये प्रति टन प्रमाणे सुमारे 11 कोटी 36 लाख 78 हजार 250 रुपये एवढी रक्कम वर्ग केली आहे. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळ पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर बँकांनी पाठवले होते अशी माहीतीही स्थानिक शेतकर्यांनी सांगितली.

दरम्यान साखर कारखान्याने पहिली उचल म्हणून 2 हजार 347 रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता . आता दुसरा हप्ता 350 रुपयाने वर्ग झाल्यानंतर साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ऊस उत्पादक शेतकरी आनंदी झाला आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!