सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा ;अकोला बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दारात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता मात्र सोयाबीनच्या खरेदीमध्ये बियाणे कंपन्यांची देखील भर पडली आहे. त्यामुळे सोयाबीन दरामध्ये दिवसाकाठी वाढ होत आहेच. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर हे 3500-5000 पर्यंत होते मात्र आत्ताचे दर पाहता ते 6000 वर जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. भविष्यातही हा दर चढाच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील मुख्य बाजारपेठेत सोयाबीनचे दर

सबंध राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 6 हजाराचा टप्पा पार केलेला आहे. शिवाय दिवसाकाठी होत असलेली वाढ ही वेगळीच. अकोला आणि लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6 हजार 800 चा दर सोयाबीनला मिळालेला आहे. पोटलीत हे दर वेगळे असले तरी सौद्यांमध्ये हाच दर मिळालेला आहे. वाशिम बाजार समितीमध्ये 6700, खामगांव बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 6400 चा दर मिळाला आहे. मागणी कायम राहिली तर दरात वाढ होणारच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

बियाणे कंपन्यांकडूनही मागणी तेजीत

एकीकडे महाबिज हे बीजोत्पादनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. उन्हाळी सोयाबीनची पेरणी करुन खरीप हंगामातील बियाणे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. तर दुसरीकडे बियाणे कंपन्याही सोयाबीनची खरेदी करु लागल्या आहेत. बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे सोयाबीन कंपन्यांकडून सध्या विविध बाजारात खरेदी केले जात आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये मध्यप्रदेशातील खरेदीदार स्थानिक पातळीवर सोयाबीनची खरेदी करीत आहेत.

सोयाबीनची साठवणूक गरजेची

सोयाबीनच्या दरात वाढ होत असली तरी अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची एकदम विक्री न करता गरजेनुसारच विक्री करणे गरजेचे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. त्यामुळेच दरामध्ये वाढ होत आहे. असाच संयम शेतकऱ्यांनी कायम ठेवला तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आता तर बियाणांसाठीही सोयाबीनची मागणी होत आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास करुनच केलेली विक्री शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!