कधी अवकाळी , कधी थंडी , पिकांची कशी घ्यावी काळजी ? तज्ञांचा मोलाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी अवकाळी पाऊस,कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी … बदलत्या वातावरणामुळे सध्या वावरात असलेल्या पिकांवर मोठा परिणाम होतो आहे. मागील दोन तीन दिवस पाऊस झाल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आहे अशावेळी काय काळजी घ्यावी याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे जाणून घेऊया…

पुढील हवामान अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 11 जानेवारी रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे परंतू पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देणे गरजेचे आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस : कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

तूर : काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास व पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे.

रब्बी ज्वारी : सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग : उन्हाळी भुईमूगाच्या लागवडीसाठी टॅग-24, टी.जी.-26, टीएलजी-45, टीजी-51, टीपीजी-41, टीजी-37, एलजीएन-2 किंवा एसबी-11 या वाणांची निवड करावी.

करडई : बागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकास हलके पाणी द्यावे तसेच पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : ढगाळ वातावरण, आर्द्रता यामूळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आंबा : आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

द्राक्ष : काढणीस वेळ असलेल्या द्राक्ष बागेत डाऊनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्षाची घडे जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Leave a Comment

error: Content is protected !!