सोयाबीनचे दर उतरतेच ; शेतकऱ्यांची चिंता कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मात्र मार्केट यार्डात अद्यापही सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. मार्केट यार्डात सोयाबीनची आवक झाली तरी दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दोन दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 200 रुपयांनी कमी झाल्याचे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाले आहे.

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन काढणीची कामे ही सुरु झालेली आहेत. पावसाचे पाणी शेतामध्ये साचले असताना देखील शेतकरी सोयाबीन हे वावराबाहेर काढत आहे. एकतर पीकाचे नुकसान झालेच आहे. शिवाय रब्बी हंगामासाठी शेत हे रिकामे करायचे असल्याने ग्रामीण भागात 4000 रुपये एकर प्रमाणे मजूरी असताना देखील काढणी कामे वेगात सुरु आहेत. मात्र, आवक वाढताच दर हे कमी होऊ लागले आहेत. गुरुवारी सोयाबीनला 5800 चा दर होता तर शुक्रवारच्या बाजारात 5600 चा दर मिळाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होत आहे पण साठवणूक करुन अधिकचे नुकसान होण्यापेक्षा आहे त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे. दुसरीकडे उडदाचे दर हे स्थिर आहेत. मात्र, उडदाची आवक ही कमी झाली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाची आवक होती. खरीपातील याच पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता. परंतू, सोयाबीनच्या तुलनेत उडदाचे क्षेत्र निम्म्यानेही नाही त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आवक ही कमी झालेली आहे. शुक्रवारी उडदाला 7300 चा दर मिळाला होता. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असल्याने लातूर येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढलेली आहे. मात्र, पाण्यात सोयाबीन राहिल्याने दर्जा ढासाळलेला आहे. परिणामी मिळेल त्या दरात विक्री करण्याची नामुष्की ही शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे.

10 हजार क्विंटलची आवक

यंदाच्या हंगामात आतापर्यंत लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक ही शुक्रवारी झाली आहे. 10 हजार क्विंटल सोयाबीन हे दाखल झाले होते. तर मालाच्या दर्जानुसार किंमतही ठरवली जात होती. सुरवातीच्या काळात पावसाचा परिणाम न झाल्याने चांगल्या प्रतीचे सोयाबीनची आवक होत होती. त्यामुळे दरही 8800 पर्यंत गेले होते आता आवक आहे पण सोयाबीन हे डागाळलेले आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!