बाजारभाव : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरणच ; उडीदही स्थिर,कृषी तज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोमवारी महाराष्ट्र बंदचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून आला. बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी बंद असल्या कारणाने मंगळवारी कृषी मालाला किती दर मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन येताच किती दर मिळेल याची उत्सुकता होती. पण मंगळवारी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. सोयाबीनच्या दरात घसरण होऊन मंगळवारी केवळ 5100 दर मिळाला. त्यामुळे शेतकयांच्यामध्ये कमालीची नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी 5600 वर गेलेले सोयाबीन मंगळवारी थेट 5100 वर आले होते. त्यामुळे भविष्यात सोयाबीनची वाढणारी आवक, सोयापेंडची आवक यामुळे सोयाबीनला कवडीमोल दर मिळणार असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.अद्यापही उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड जिल्ह्यात काढणी आणि मळणीची कामे सुरुच आहेत. तर भविष्यात सोयाबीनची आवक ही वाढणार आहे. सध्या केवळ 8 हजार क्विंटलची आवक होऊनही दर 5 हजारापर्यंत आले असतील तर ऐन हंगामात लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 50 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. त्यादरम्यान सोयाबीनचे काय दर होणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे.दोन दिवस लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे मंगळवारी आवक वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आवक स्थिर असूनही दर 600 रुपयांनी घसरलेले आहेत.

काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

सोयाबीन साठवणूक केली तरी भविष्यात दर वाढतील अशी चिन्हे सध्या तरी नाहीत. शिवाय पावसाने सोयाबीन भिजले असल्याने जास्त दिवस साठवणूक केली तर सडण्याची भिती आहे किंवा बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची साठवणूक न करता आहे त्या दरामध्ये विक्री करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. विक्री करावी तर पडेल त्या दरात आणि साठवणूक करावी तर नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांची व्दीधा मनस्थिती झालेली आहे.

उडदाचे दरही स्थिरच

या हंगामात उडदामुळे शेतकऱ्यांने आर्थिक आधार मिळालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून बाजारात उडदाचे दर हे वाढलेले आहेत किंवा स्थिर राहिलेले आहेत. मात्र, दरामध्ये घट अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनमधून अधिकचे पैसे पदरी पडले नसले तरी उडदाने उत्पन्नात वाढ झालेली आहे. 7 हजारवरील दर आता 7200 वर गेले आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाने डागाळलेल्या उडदाची आवक झाली होती मात्र, आता दर्जेदार माल बाजारात दाखल होत असून त्याप्रमाणे दरही मिळत आहे. सोयाबीनची कसर उडदाने भरुन काढली असली तरी उडदाचे क्षेत्र कमी आहे.

दरम्यान लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6600 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6350 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6150 रुपये क्विंटल, जानकी चना 5050 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4900, सोयाबीन 5600, चमकी मूग 7000 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!