सोयाबीन बियाणे महागले ; पहा किती रुपये झाला आहे दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीन आणि कापूस पिकांना चांगला भाव मिळत असल्यामुळे या दोन्ही पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आगामी खरीप हंगामात सोयाबीन लागवडीकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. खरिपाची बियाणे खते आणि इतर शेतीविषयी बाबींच्या तयारीत शेतकरी आहे. मात्र खतांच्या दरवाढीनंतर आता बियाणे दरवाढीचा झटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. गेल्या हंगामात साधारणतः ७५ रुपयांपर्यंत विकलेले सोयाबीन बियाणे यंदा तब्बल १३० ते १४५ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.शेतकऱ्यांचे महामंडळ म्हटल्या जाणाऱ्या ‘महाबीज’चे बियाणेही अपेक्षेपेक्षा जास्त महाग झाले आहे.

आगामी हंगामासाठी नुकतेच महाबीज प्रशासनाने दर जाहीर केले आहेत. यात प्रामुख्याने सोयाबीन या वाणाचे दर बघितले असता गेल्या हंगामाच्या तुलनेत मोठी वाढ दिसून आली. मागील वेळी सोयाबीनची ३० किलोची बॅग साधारणपणे २२५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा आता हीच बॅग तब्बल २ हजारांनी महागली आहे. आता ३० किलो वजनाची बॅग ३९०० ते ४३५० रुपयांना घ्यावी लागेल. गेल्या हंगामात काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. बियाणे मिळविण्यासाठी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला गेला. अति उष्णतेमुळे या उन्हाळी हंगामातूनही अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. परिणामी मागणीच्या तुलनेत महाबीजचा सोयाबीन बियाणे पुरवठा कमीच राहणार, हे निश्‍चित झाले आहे. शिवाय बाहेरून बियाणे खरेदी न करण्याबाबत शासनाने महाबीजला आधीच सुचवलेले असल्याने उपलब्ध बियाण्यावरच हंगाम साधण्याची कसरत करावी लागणार, हे स्पष्ट आहे.सोयाबीनचे वाढलेले भाव, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतुकीचा खर्च असे विविध प्रकारचे वाढीव खर्च पाहता यंदा सोयाबीनची दरवाढ अपरिहार्य होती, असे महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगत दरवाढीचे समर्थनच केले.

इतर कंपन्यांची दरवाढ करण्याची शक्यता

–हंगामात बहुतांश कंपन्यांचे दर महाबीज बियाण्याच्या दरांवर ठरवले जातात.
–महाबीजनेच यंदा दर वाढविल्याने आता खासगी कंपन्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
–बाजारात सोयाबीन बियाणे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पाऊस वेळेपूर्वीच दाखल झाला, तर बियाणे खरेदीसाठी गर्दीसुद्धा वाढू शकते.
–महाबीजच्या वाढीव दरांचा फायदा आता कंपन्यासुद्धा घेऊ शकतात.
–राज्यात सोयाबीनचे यंदा सुमारे ४६ लाख हेक्टर लागवड क्षेत्र अपेक्षित आहे. त्यासाठी १७ लाख ९५ हजार क्विंटल बियाणे आवश्‍यक आहे.
–महाबीजकडे किती बियाणे राहील, याची अद्यापही निश्‍चित माहिती मिळत नाही. उन्हाळी हंगामातून येणाऱ्या बियाण्यावर हे ठरणार आहे.

सोयाबीन बियाण्यांचे दर

१) १० वर्षांच्या आतील वाण ः फुले किमया, एएमएस-१००१, फुले संगम, एमएयुएस ६१२, एमएसीएस १२८१ ११८८, ईव्हीएस २१ या वाणांसाठी किलोला १४५ रुपये दर काढण्यात आला.

२) १० ते १५ वर्षांच्या आतील वाण ः एमएयूएस १५८ हा वाण १४५ रुपये किलो.

३) १५ वर्षांवरील वाण ः डीएस २२८ (फुले कल्याणी), जेएस ९३०५, एमएयुएस ७१ या वाणांचा दर १४५ रुपये किलो,

तर जेएस ३३५ हा वाण १३० रुपये किलोने घ्यावा लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!