राज्यात कापूस ,सोयाबीनसह तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष कृती योजना राबवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम तोंडावर आला आहे. राज्यातील कृषी विभाग देखील खरिपाच्या तयारीला लागला आहे. आगामी खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे यांची पुरेपूर उपलब्धता व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. खरीप हंगाम 2022 बियाणे पुरवठा आणि उपलब्धतेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरुन सोयाबीनच्या बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे. तसेच तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी. कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश दादाजी भुसे यांनी दिले आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवणे व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवली जाणार आहे. याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा

राज्यातील शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियांणांचा पुरवठा करावा, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीनला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाण्यांची उपलब्धता वाढविण्यात यावी. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरुन खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत. प्रयोगशाळांना सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, महाबीज यांनी समन्वयाने काम करावं, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

अन्नधान्य पिकांच्या 17.95 लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता

राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 146.85 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. या क्षेत्रावरील पेरणीसाठी बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार अन्नधान्य पिकांच्या 17.95 लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. बियाणे गरजेच्या तुलनेत महाबीज 1.72 लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगम 0.15 लाख क्विंटल, खासगी उत्पादकांमार्फत 18.01 लाख क्विंटल असे एकूण 19.88 लाख क्विंटल बियाणे या संस्थांकडून उपलब्ध होणार आहे.

खरीप हंगाम 2022 मधील बियाणे उपलब्धता व पुरवठा, बीजोत्पादनाची आढावा बैठक भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धीरज कुमार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी, कृषी संचालक दिलीप झेंडे, कृषी विद्यापीठ, महाबीज, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!