ऊस तोडणी मशीनला आग…! दीड कोटींचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मजुरांची टंचाई आणि इतर कारणांमुळे ऊसतोडणीसाठी शेतकरी मशीनला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी मशीनलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे. बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील आप्पा चव्हाण यांची सदर ऊसतोडणी मशीन आहे. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी या मशिनद्वारे बागणी परिसरातील ऊस तोडणीचे काम सुरू होते.

रविवारी या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. शेतानजीक जवळ असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ ऊस तोडणी मशीन दुरुस्तीसाठी आणण्यात आले. दुरुस्तीवेळी वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी डिझेल पाईप लिकेज असल्याने वेल्डिंगच्या ठिणग्या डिझेल वर पडल्याने मशीनने अचानक पेट घेतला. आग आटोक्या बाहेर गेली होती. बाजूला असणाऱ्या कामगारांनी प्रसंगावधान राखून मशीन पासून दूर गेले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

परिसरातील शेतकरी व स्थानिक युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आष्टा नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात संपर्क साधून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन भोवती आगीचे लोट पसरल्याने आग आटोक्यात येण्यास जवळपास तीन तास वेळ लागला. यात सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सततच्या पावसाने शेतात ऊसतोडणी मशीन चालू न शकल्याने या धंद्यात मंदीचे सावट असताना सध्या शेतात घात आल्याने मशीन तोडणीस सुरवात झाली होती. तो पर्यंतच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!