हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने (६) बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आज बळीराजा एकाकी पडलेला असताना त्याला तुमच्या साथीची गरज आहे. त्यामुळं शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभं राहावं असे आवाहन रविकांत तुपकरांनी केलं आहे.
याबाबत बोलताना तुपकर म्हणाले, बळीराजा आता संकटात आहे. अतिवृष्टीनं त्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जे पीक वाचलं त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं भाव राहिलेला नाही. यावर्षी तर सोयाबीन-कापसाचा उत्पादन खर्चही भरुन निघणार नाही, अशी अवस्था आहे. यावर्षी सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च 6 हजार रुपये आहे. तर मिळणारा भाव 4 हजार रुपये आहे. कापसाचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8 हजार 500 रूपये आहे आणि बाजारात कापसाला भाव फक्त 6 ते 7 हजार आहे. त्यामुळं शेतकरी आज तोट्यात आला आहे. त्याचा परिणाम शेतकरी आत्महत्याकडे प्रवृत्त होत आहे. ही सर्वांसाठी चिंतनाची बाब असल्याचे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांचा आता सर्वांवरचा विश्वास उडालेला आहे, त्यामुळं शेतकरी, शेतमजूर आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे तुपकर म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा
उद्या बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येनं बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात ही आपल्या बुलढाण्यातून होत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त आपण सहभागी व्हावं, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून धार द्या. तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
तुमची पाठीवरची थाप आणि एल्गार मोर्चातली साथ शेतकऱ्याला जगण्याला उभारी देणार असल्याचे तुपकर म्हणाले. त्यासाठी आपल्या पक्षाचे जाती-धर्माचे सर्व झेंडे बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून एकत्र या. आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘एल्गार मोर्चा’त सहभागी होऊन बळीराजाला हिम्मत द्या. एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी आपण दिला पाहीजे. शेतकरी, शेतमजूर तुमची वाट पाहतोय… नक्की या असे तुपकर म्हणाले.
आपल्या ताटातला अन्नाचा कण अन् कण शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही. अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसितच झालेलं नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही, असे तुपकर म्हणाले.