खरीप हंगाम वाया जाऊ देऊ नका ! सद्य हवामान स्थितीनुसार पिकांची अशी घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होताच राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पावसाची उघडीप असली तरी सोयाबीन, कपाशी, तूर, मका या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्यवस्थापन

कापूस : कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस पिकास नत्रखताची दूसरी मात्रा 60 किलो नत्र (बागायती) व 36 किलो नत्र (कोरडवाहू) प्रति हेक्टरी द्यावे. कापूस पिकात 19:19:19 100 ग्रॅम किंवा यूरिया 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

तूर : तूर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मूग/उडीद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

मुग/उडीद : मुग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भुईमूग : भुईमूग पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मका पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मका पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास नत्र खताची मात्रा 75 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.

मका : मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!