अवकाळीने महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; 460 हेक्टरवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : सकलेन मुलाणी सातारा

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीस मॉन्सूनोत्तर झालेल्या पावसामुळे महाबळेश्वर,जावळी, वाई तालुक्यांतील स्ट्रॉबेरी पिकांस फटका बसला आहे. कृषी विभागाकडून नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ४५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने येथील शेतकरी कोलमडल्याचे चित्र आहे.

राज्यासह देशात महाबळेश्वरच्‍या स्ट्रॉबेरीचा गोडवा प्रसिद्ध आहे. थंड वातावरणामुळे येथील स्ट्रॉबेरीची देशभर मागणी असते. मात्र, तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरी पिकांच्या मागे संकटाचे ग्रहण सुरू आहे. कोरोनाच्या काळात मातृरोपे उशिरा येणे, लॉकडाउनमुळे विक्रीत अडचणी, पर्यटनस्थळे बंद असल्याने स्ट्रॉबेरीचे अतोनात नुकसान झाले झाले. या संकटातून बाहेर पडत असतानाच या हंगामात स्ट्रॉबेरीला चांगले दिवस येतील, या आशेवर शेतकऱ्यांनी भांडवली खर्च करत नव्या उमेदीने लागवड केली होती. पहिल्या टप्प्यात लागवड झालेली स्ट्रॉबेरी सुरू झाली होती. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात सलग चार दिवस झोडपून काढल्याने पहिला बहर वाया जाण्याबरोबर रोपांना मुळकुज लागली आहे.

शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने फळासह रोपेही खराब झाली आहे. नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने हंगामातील सर्वाधिक दर या काळात मिळतो. मात्र, पावसामुळे स्ट्रॉबेरीचा पहिला बहर जवळपास वाया गेल्याने डिसेंबरअखेरीस स्ट्रॉबेरी विकण्यास मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना या चांगल्या दरापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या ठिकाणी रोपेच खराब झाली आहेत, अशा शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!