ज्वारीच्या कणसाला पक्षांपासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘देसी जुगाड’ ठरतोय प्रभावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकांपैकी एक असलेले पीक म्हणजे ज्वारी. ज्वारीचे पीक सध्या हुरड्यात आले आहे. ज्वारीच्या अशा अवस्थेत ज्वारीच्या कणसाचे संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिक पिशव्यांचे आवरण कणसाला शेतकऱ्यांनी घातले असून हा जुगाड चांगला कामी आला आहे.

अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात ज्वारीचे पीक कमी अधिक प्रमाणात घेतले जाते. ज्वारीचे हे पीक फेब्रुवारी-मार्चमध्ये काढणीला येते आता चांगली कणसं तयार झाली असून त्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे तुटून पडतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. या पूर्वीच्या काळामध्ये शेतामध्ये बुजगावणी घालून किंवा गोफन फिरवून पक्षांना हटवलं जायचं. मात्र आता शेतकर्‍यांनी एक नवा जुगाड शोधून काढत ज्वारीच्या कणसांना प्लास्टिकच्या पिशव्या घातल्या आहेत. याचा चांगला उपयोग होत असून पक्षांना ज्वारीचे दाणे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र खाता येत नाहीत. तसंच प्लास्टिक उन्हामुळे चमकत असल्यामुळे कोणीतरी असल्याचा भास ‘या’ पक्षांना होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मात्र टळत आहे.

कमी पाण्यावर जगणारे पीक म्हणून ज्वारीचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते नेवासे बुद्रूक, भालगाव, घोडेगाव, नारायणवाडी, तामसवाडी, शिवारात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. नेवासे तालुक्‍यात यंदा ज्वारी केवळ एक हजार 200 हेक्‍टरवर पेरणी केली आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या तिथं पक्षांचे थवे मोठ्या प्रमाणात येऊन धान्य फस्त करतात त्यामुळे हा जुगाड आता चांगलाच कामी येतो आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!