एकीकडे वाढतोय कापसाचा भाव; दुसरीकडे ‘अल्टरनेरिया’ या बुरशी रोगाचे आक्रमण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षात कापूस हे पीक असे होते ज्याला सर्वाधिक भाव मिळाला. यंदाच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कापसाला चांगले भाव मिळतील अशी आशा आहे मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीनंतरही कपाशीची स्थिती समाधानकारक होती. दोन-तीन वेचण्या होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीवर अचानक ‘अल्टरनेरिया’ या बुरशी रोगाचे आक्रमण झाले. याचा परिणाम फूल, पातीवर होत आहे, त्यामुळे एका वेच्यातच कापसाची उलगंवाडी होण्याचा धोका कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. तसेच चित्र आज अनेक शेतात दिसून येत आहे.

सद्यःस्थितीत कपाशी चांगली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेले नुकसान कपाशीतून काही प्रमाणात दूर होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. आता अचानक कपाशीवर ‘अल्टरनेरिया’ या बुरशीजन्य आजाराचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे उत्तम स्थितीत असलेली कपाशी लालसर, पिवळसर दिसत आहे. हा प्रादूर्भाव ठरावीक क्षेत्रात नसून, सर्वदूर दिसून येतो. या प्रादूर्भावामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत.

कपाशीचे भाव वाढत असताना आता एका वेच्यातच कापूस गेल्यास या हंगामातील सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे, बुरशीचा प्रादूर्भाव सर्व जिल्ह्यात दिसून येतो. यंदा खरीप हंगामाच्या सुुरुवातीपासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत आहे. हंगाम संपताना संकटांची मालिका सुरूच आहे. शेवटच्या टप्प्यात कपाशीवर झालेला प्रादूर्भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या रोगाचा परिणाम

–रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीची पाने गळून पडत आहेत

–पानातील कर्बग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावल्याचा झाडावर परिणाम

–पानगळीनंतर नवीन फूल, पाती येण्याची शक्यता फार कमी

–कपाशी लालसर, पिवळसर दिसत आहे

अल्टरनेरिया’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अचानकपणे कपाशीवर वाढताना दिसतोय. काही भागांतील निरीक्षण पाहता एका वेच्यातच कापूस संपणार आहे. नवीन फुले, पाती येण्याची शक्यता कमी आहे. बुरशीनाशक फवारणी करून रोगाला रोखणे शक्य आहे.

– डॉ. प्रमोद यादगीरवार, शास्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

error: Content is protected !!