लाळ्या खुरकूतने घेतला चार जनावरे ,20 बकऱ्यांचा बळी ; कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील मलिग्रे पंचक्रोशीतील लाळ्या खुरकूत आजाराची जोरदार साथ पसरली आहे. यामुळे चार जनावरं आणि 20 शेळ्या दगावलया आहेत. पशुधन विभागाच्या पथकाने सर्वेक्षण सुरू केले असून आजारी जनावरांची तपासणी सुरू केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आठ-दहा दिवसांपासून गावात लाळ्या खुरकूत रोगाची साथ पसरली आहे. या साथीचा प्रसार वेगाने झाला यामुळे चार म्हशी, पाच रेडके व 20 शेळ्यांचा मृत्यू झालाय. दयानंद बुगडे ,दयानंद कागिंकर ,धनाजी सावंत यांच्या 3 म्हशीचा मृत्यू झाला आहे. मारुती साळुंखे, कृष्णा पारदे, लिलाबाई निकम, ताराबाई शेळके ,तुकाराम बुगडे, यशवंत कागिंकर, जगदीश कागिंकर यांच्या सुमारे 20 बकऱ्यांचा मृत्यू झालाय.

याबाबत बोलताना आजऱ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पी डी ढेकळे म्हणाले ” लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाबाबत पशु पालकांना आवाहन केले होते. अनेकदा गैरसमजुतीने पशुपालकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. ज्या जनावरांचे लसीकरण झालेलं नाही त्यांना बाधा झाली आहे. सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर कोरोना नंतर जनावरांचे बाजार खुले झाल्याने कर्नाटकातून जनावरांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. अनेकदा बाहेरून आलेल्या जनावरांकडून साथ पसरते. बकऱ्याचे लाळ्या खुरकूत चे लसीकरण दरवर्षी केले जाते. पण लस उपलब्ध झाली नसल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कडून लसीबाबत गैरसमज असल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

रोगाची लक्षणे

1) सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व चारा खाल्ल्याने होतो.

२) रोगाची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

३) पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

रोगावरील उपाय

1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.

2) आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.

3) आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.

4) दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी.

5) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात जनावरांना द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!