उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच नवनवीन आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर आपल्या शेतामध्ये करताना दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीने ऊसाला पाणी देणे हे खूप मेहनतीचं काम आहे. मात्र एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवून वेळ, वीज, पैसा, खत या सर्वांचीच बचत केली आहे. पाहुयात काय आहे ही ऊसाला पाणी देण्याची वेगळी पद्धत…

शिराळा तालुक्यातील देवडी येथील राजाराम केरु खोत या शेतकऱ्यांना उसाला समान पाणी देण्यासाठी नवीन युक्ती शोधली आहे. राजाराम खोत यांनी तीस गुंठे क्षेत्रासाठी हा प्रयोग केला आहे पाच हजार रुपये खर्च करून त्यांनी उसाला पाटाने पाणी देण्याऐवजी पीव्हीसी 3 इंची पाईपला उसाच्या सरी च्या अंतरावर होल मारून त्या होलवर ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या लॅटरल चार ते पाच फूट लांबीच्या पाईपचे तुकडे वापरले आहेत. पीव्हीसी पाईपला लॅटरल पाईपचे दोन तुकडे जोडून ते थेट उसाच्या सरीत सोडले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या युक्ती साठी विद्युत पंपाची शक्ती आणि उसाचं क्षेत्र यावर पाईपचे गणित ठरवून फिटिंग केले गेले आहे.एकाच वेळी प्रत्येक सरीत समान पाणी जात असल्यामुळे पाणी शेवटच्या टोकापर्यंत एकाच वेळी जाते पाणी उभा राहून पाजावे लागत नाही.

काय आहेत फायदे

– या पद्धतीमुळे सरीत पाणीपाठी मागे पुढे होत नाही.
– पूर्वी पाणी पाजण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागत होते आता अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. म्हणजेच वेळेची बचत होते.
– विजेची बचत होते.
– पाणी वाया जात नाही.
– दिलेले खत वाहून जात नाही.

दरम्यान या युक्तीमुळे एकाच वेळी सरीत समान पाणी जात आहे त्यामुळे पाणी, वेळ, वीज, पैसा यांची बचत होते. केवळ पाच हजार रुपये खर्च करून हे स्वतः सर्व या शेतकऱ्याने तयार केले आहे आता वर्षभर कोणताही खर्च यावर करावा लागणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी खोत यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!