Kharif 2022 : शेतकऱ्यांनो सावधान …! येथे होतोय कापूस बियाण्यांचा काळाबाजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामात (Kharif 2022) कोणत्या पिकाला सर्वाधिक भाव मिळाला असेल तर तो कापसाला मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच आगामी खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बोगस बियाण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातपुडा पर्वतालगत जळगाव, धुळे, नंदुरबार तालुक्यात हा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. या बियाण्याची लागवडही काही भागात पूर्ण झाल्याची कुजबूज आहे. शेतकऱ्यांनी चांगले कापूस उत्पादन घ्यावे म्हणून शासनही विविध उपक्रम घेत आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमाला बोगस बियाण्याचे गालबोट लागण्याची शक्यता आहे.

खानदेशात अवैध किंवा एचटीबीटी (हर्बीसाईड टॉलरंट बॅसिलस थुरिलेंझीस) (Cotton) नावाने अवैध कापूस बियाणे विक्री सुरू असल्याची माहिती आहे. ४५० ग्रॅम वजनाची पाकिटे दोन हजार रुपये प्रतिपाकिट या दरात शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल व लगत हा प्रकार सुरू आहे. चोपड्यातील अकुलखेडे हे गाव अवैध कापूस बियाणे विक्रीचे केंद्र बनल्याची चर्चा बाजारात आहे. एका खरेदीदाराला किमान १०० पाकिटे घेण्याची अट घातली जात आहे. या प्रकाराबाबत कृषी विभाग अनभिज्ञ आहे की झोपेचे सोंग घेऊन बसला आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

कुठून येतायत बोगस बियाणे ?

धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातही या अवैध बियाण्याचा व्यवसाय जोर धरत आहे. एक लाख पाकिटांनी विक्री आतापर्यंत झाल्याची माहिती आहे. आणखी तीन ते चार लाख पाकिटांची विक्री होईल, असा संशय आहे. जळगावमधील चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा हा भाग आगाप किंवा पूर्वहंगामी कापूस लागवडीत आघाडीवर आहे. मेच्या सुरुवातीला लागवड उरकायची आणि ऑक्टोबरअखेरीस हंगाम (Kharif 2022)आटोपून लागलीच हरभरा, मका किंवा इतर पिके घ्यायची, असा प्रयत्न या भागात शेतकरी करतात. यातच बियाणे बाजारात अधिकृतपणे कापूस बियाणे विक्री सुरू नाही. याचा लाभ काळाबाजार करणारी मंडळी घेत आहे. मध्य प्रदेश, गुजरातमधून हे बियाणे दाखल होत असल्याची चर्चा आहे.

cotton

बियाणे विक्रेते पाळणार बंद

अवैध कापूस बियाणे विक्रीविरोधात जळगाव जिल्ह्यात खते, बियाणे वितरक असोसिएशन बंद पाळणार आहे. तसेच याबाबत मंगळवारी (ता. १०) बैठक घेतली आहे. त्यात असोसिएशनची पुढील भूमिका ठरेल. कृषी विभागाने जिल्ह्यात कापूस बियाणे अधिकृतपणे विक्रीला १५ मे पासून परवानगी द्यावी. १ जूनपर्यंत अवैध कापूस बियाण्याची मोठी लागवड होईल.(Kharif 2022) परिणामी बियाणे विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल, असे संघटनेचे सुनील कोंडे यांनी म्हटले आहे.

राज्यात सर्वाधिक कापूस लागवडीचे क्षेत्र जळगावात आहे. यंदाच्या वर्षी साडेपाच लाख हेक्टरवर लागवड एकट्या जळगावात अपेक्षित आहे. तर खानदेशात एकूण साडेनऊ लाख हेक्टरवर लागवड होईल. यात जळगावमधील चोपडा, जामनेर, यावल, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड अधिकची केली जाते. यंदा किमान दोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड होवू शकते, असाही अंदाज आहे.

संदर्भ : ऍग्रोवन

Leave a Comment

error: Content is protected !!