‘या’ बुरशीमुळे कोंबड्यांना होते विषबाधा; काय घ्याल काळजी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो. कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात.

विषबाधेस कारणीभूत असलेल्या बुरशीचे प्रकार

अफ्लाटॉक्झिन व ऑकराटॉक्झिन अशा दोन प्रकारच्या बुरशी खाद्यामध्ये तयार होऊन कोंबड्यांमध्ये विषबाधा होते.

अफ्लाटॉक्झिन

या विषामुळे होणाऱ्या विषबाधेला अफ्लाटॉक्झिकोसिस म्हणतात. हे विष बुरशीच्या अनेक प्रजातींपासून तयार होते. अॅस्परजिलस फ्लेवस ही प्रजाती सर्वांत जास्त विष तयार करते. नैसर्गिकरीत्या अफ्लाटॉक्झिनचे बी-१, बी-२, जी-१ आणि जी-२ असे चार प्रकार आहेत. बी-१ हा प्रकार सर्वांत जास्त विषारी असून, कोंबड्यांच्या यकृतास हानिकारक असतो.

ऑकराटॉक्झिन

ऑकराटॉक्झिनपासून होणाऱ्या विषबाधेला ऑकराटॉक्झिकोसिस म्हणतात. अॅस्पर्जिलस व पेनिसिलियम बुरशीच्या प्रजाती हे विष तयार करतात. प्रामुख्याने अॅस्परजिलस ऑकरासियस ही बुरशी अधिक प्रमाणात ऑकराटॉक्झिन तयार करते. ऑकराटॉक्झिनचे ए, बी, सी आणि डी असे चार प्रकार असतात. ऑकराटॉक्झिन ए हे अधिक विषारी असून, जास्त प्रमाणात आढळते. खाद्यामध्ये हे विष जरी कमी प्रमाणात आढळत असले तरी कोंबड्यांमध्ये या विषामुळे होणारे नुकसान अधिक प्रमाणात असते. मूत्रपिंड व मूत्रनलिकेला हे हानिकारक असल्याने पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण जास्त आढळून येते.

परिणाम

वाढ व अंडी उत्पादनात घट, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडणे, अंड्यांची उबवणक्षमता कमी होणे, अशक्तपणा, पांगळेपणा, पाणी व आहार ग्रहणात घट, हगवण, पंख खडबडीत होणे व जास्त प्रमाणात मरतुकीचे प्रमाण इत्यादी लक्षणे आढळून येतात. कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यास अफ्लाटॉक्झिकोसिसमध्ये यकृताला सूज, पिवळेपणा व नरमपणा येतो. तसेच, ऑकराटॉक्झिकोसिसमध्ये मूत्रपिंड लाल व मोठे होते आणि मूत्रनलिकेत पांढऱ्या रंगाचे युरिक ॲसिड जास्त प्रमाणात जमा झाल्याचे आढळून येते.

उपाययोजना

विषबाधेवर प्रत्यक्ष गुणकारी औषध नाही. विषबाधा झालेल्या कोंबड्यांना पूरक औषध म्हणून लिव्हर टॉनिक व जीवनसत्त्वे पाण्यात मिसळून द्यावीत.

हळद पावडर ५० ग्रॅम प्रति १०० किलो खाद्यामध्ये किंवा १ ग्रॅम प्रति २ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये ४ दिवस दिल्यास बुरशीमुळे कोंबड्यांमधील मरतूक कमी करता येते.

विषबाधेवर प्रतिबंधक उपाय म्हणून कुक्कुट खाद्यामध्ये ओलावा किंवा बुरशीची वाढ झाली नाही ना, याची खात्री करावी. खराब व ओलसर झालेले धान्य खाद्यात वापरू नये.

खाद्यांची साठवण जमिनीच्या वर एक ते दीड फूट उंचावर करावी.

खाद्य हे जीवाणू, विषाणू, बुरशी आणि विषारी घटक आणि निरुपयोगी घटकांपासून मुक्त असावे.

खाद्य जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ देऊ नये.

खाद्य कोरड्या जागेवर व सभोवताली हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवून ठेवावे.

खाद्यगृहामध्ये उंदीर, घुशी, पक्षी, कुत्रे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

कोंबड्यांना मॅश फीडएेवजी गोळी तुकडा खाद्य देणे फायदेशीर ठरते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खाद्यामध्ये बदल करून कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन करावे.

कोंबड्यांना खाद्य देताना ते सांडणार नाही याची काळजी घ्यावी.

स्रोत : ऍग्रो वन

error: Content is protected !!