अशा प्रकारे करा कपाशीवरील कीड आणि तण नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसावर ढगाळ हवामान आणि दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्याच्या काही भागांत पावसाने चांगलाच जोर धरलाय. या ठिकाणी कापूस पिकावर रसशोषक किडीआणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच तण व्यवस्थापनाविषयी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढील सल्ला दिला आहेः

अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा

लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुलोरा अवस्थेतील कपाशीवर २ टक्के युरियाची फवारणी करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी कपाशी पिकामध्ये मृत सर काढावी. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी कपाशी पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

कापूस पिकातील तण नियंत्रण

  • कोळपणी आणि खुरपणी करुन पीक तणविरहीत ठेवावे. गवताळ तणांच्या नियंत्रणासाठी क्वीझॉलफॉप इथील (५ टक्के इसी) २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी पायरीथीयोबॅक सोडीयम (४ टक्के इसी) २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गवताळ आणि रुंद पानाच्या अशा दोन्ही प्रकारच्या तण नियंत्रणासाठी क्वीझॉलफॉप इथील (६ टक्के इसी) २ मिली अधिक पायरिथोओबॅक सोडीयम (४ टक्के इसी) २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बागायती संकरित कपाशी करिता

बागायती संकरित कपाशीमध्ये नत्राचा पहिला हप्ता हेक्टरी ४० किलो द्यावा. त्यासाठी हेक्टरी ९० किलो युरिया द्यावा लागेल. तर कोरडवाहू कपाशीमध्ये नत्राचा हेक्टरी ३० किलो हप्ता लागतो. त्यासाठी ६५ किलो युरिया लागेल.

रस शोषक किडींचा प्रादुर्भाव :

१४ ते १५ दिवसाच्या पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फ्लोनीकॅमिड (५० डब्लूजी) ८० ग्रॅम किंवा डीनोटेफ्युरॉन (२० एस जी) ६० ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्लू जी) ४० ग्रॅम एकरी फवारणी करावी.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येत असल्यास एकरी दोन फेरोमन सापळे लावावेत. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा फ्लोनीकॅमीड (५० टक्के डब्लू जी) ३ ग्रॅम किंवा बुप्रोफेनझीन (२५ टक्के एससी) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!