बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची खा. अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी खा. ड़ॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आला आहे.

बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी कोल्हे यांनी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे. बैलगाडा शर्यत नेमकी काय, ती कशी आयोजित केली जाते, बैलगाडा शर्यतीतून कशाप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, बैल मालक बैलांची कशी काळजी घेतात याविषयी श्री. रुपाला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैलगाडा शर्यतीला ४०० वर्षांची परंपरा असून ती टिकणे महत्त्वाचे आहे. बैलगाड्या शर्यत बंद झाल्यामुळे बैलांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे देशी गोवंश जतन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, अशी माहिती पुरुषोत्तम रुपाला यांना कोल्हे यांनी दिली.

मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सह-सचिवांसमवेत बैठक आयोजित करुन एक पाऊल पुढे टाकले होते. आता विद्यमान पशुसंवर्धनमंत्री देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!