जलसमाधी आंदोलना’साठी शेतकऱ्यांसह तुपकर मुंबईकडे रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या (२४) राजी ते शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. त्याकरिता आज (२३) तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आता माघार नाही

बुलढाण्यातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरसमोरुन आज बुधवारी सकाळी ११ वाजता वाहनांचा ताफा मार्गस्थ झाला. “सरकारकडून चर्चेसाठी कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आता माघार नाही.शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा आहे. सरकारने टोकाची भूमिका घेतली तर आम्ही शहीद व्हायला तयार आहोत. पोलिसांनी अडवाअडवी केल्यास रक्तपात होईल,“ असा इशारा तुपकर यांनी दिला. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात आला. परंतु त्यानंतरही शासनाने ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत तुपकर यांनी थेट मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आम्ही सरकारला जागे करायला निघालो आहे. वास्तविक अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न यापूर्वी कुणीच केला नाही परंतु सरकार शेतकऱ्यांचा आवाह ऐकायला तयारच नसल्याने आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आता माघार नाही, २४ नोव्हेंबर रोजी मंत्रालयाच्या शेजारी मरीन ड्राईव्ह येथे अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या ?

–उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या सूत्राप्रमाणे सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार तर कापसाला दिड हजार रुपये भाव द्या.
–सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा.
–आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा.
— खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा.
–ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा.
–शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे.
–जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
— त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.

 

error: Content is protected !!