पर्यावरणातील बदलाच्यादृष्टीने विद्यापीठाने नवीन पीक पध्दतीचे संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा : कृषी मंत्री दादाजी भुसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यत विक्रीकरीता उपलब्ध करुन दिल्यास त्या शेतीमालास चांगला भाव मिळून शेतकरी आर्थिक संपन्न होईल. तरी शहरात व विद्यापीठाजवळ ज्या ठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे थेट विक्री करण्यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाने जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच मागील काही वर्षापासून पर्यावरणाच्या वेगवेगळे बदल झाले दिसून येत आहेत. पर्यावरणातील बदलाच्यादृष्टीने विद्यापीठाने नवीन पीक पध्दतीचे संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. जिल्ह्यातील विविध कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागाच्या गोल्डन जुबिली सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

शेतीबाबत संशोधन गरजेचे

यावेळी बोलताना कृषीमंत्री भुसे म्हणाले की, पर्यावरणाच्या बदलत्या स्थितीच्यादृष्टीने त्यावर शेतीमध्ये पिके घेण्यासाठी संशोधन होणे गरजेचे असून विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. सोयाबिनचे क्षेत्र जिल्ह्यात चांगले असून अन्न प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत त्यांना तात्काळ मान्यता देण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी निर्देश दिले. सर्व महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांना महाबीजचे हरभऱ्याचे वाण सवलतीच्यादरामध्ये बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच डीएपी खतांची जास्तीची आवश्यकता भासणार असल्याचे याचेही शासनस्तरावर नियोजन करु असे सांगून शासनस्तरावर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना आखल्या जात असून बऱ्याचशा शासकीय योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. पोकरामध्ये गावाची निवड होवून जर शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात येत नसेल तर ही खुप गंभीर बाब आहे असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेस गती देण्यासाठी राज्यस्तरावर लवकरच आढावा बैठक घेवून संबंधितांनी काम कमी केले असेल तर त्यांना नोटीस तर जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन काम थांबविल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगितले.

बैठकीत जिल्हानिहाय अंतिम पेरणी क्षेत्र,तालुकानिहाय व पिकनिहाय पेरणी अहवाल, सन 2021 मधील महिनानिहाय पर्जन्यमान, प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2021, स्थानिक आपती पुर्वसुचना व सर्वेक्षण, पिक कापणी प्रयोग, अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल, सप्टेंबर 2021 मध्ये 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधीत क्षेत्राची माहिती, प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, रब्बी हंगाम 2021 बियाणे मागणी पुरवठा व नियोजन, रब्बी हंगाम 2021 बियाणे पुरवठा विक्री व शिल्लक अहवाल, पिकनिहाय प्रस्तावित क्षेत्र व बियाणे मागणी, जिल्हानिहाय खताची मागणी व पुरवठा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके 2021-22 अंतर्गत रब्बी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिक लक्षांक, राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानातंर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम, खरीप हंगाम पिक प्रात्यक्षिक उद्दीष्ट व साध्य तपशील, संत सावता माळी रयत बाजार अभियान अहवाल, पोकरा अंतर्गत प्रकल्पात समाविष्ट गावे व घटकनिहाय खर्च, नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्प मृद व जलसंधारण कामांचा प्रगती अहवाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांनी दिली.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी परभणी तालुक्यातील जांब शिवारातील विकेल ते पिकेल अंतर्गत आत्माच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री स्टॉलचे फित कापुन उदघाटनही केले तसेच शेतकरी अशोक पवार यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुरु डॉ.अशोक ढवण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कृषी विभागीय सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

error: Content is protected !!