अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा पिकावर मोठा परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | गेल्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. १-२ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वरसह राजापूर, लांजा तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आता कोकणातील काजू आणि आंबा पिकावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. .दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते.

काल मुंबई आणि पुण्यासह कोकण विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. त्यामुळे हवेत उष्माही वाढला होता. दुपारी ३ वाजल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, विल्ये, पोचरी या भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाचा शिडकावा सुरूच होता. तर संगमेश्‍वर परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. गुरुवारी दुपारी २ वाजल्यानंतर ठरावीक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुरंबी, सोनवडे, लोवले येथे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. देवरूख परिसरात ढगाळ वातावरण असूनही पाऊस नव्हता. बुधवारी पहाटे देवरूख परिसरात पाऊस झाला होता. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होते.

या पावसाच्या परिस्थितीत आंब्यावर मोहोर दिसेल, पण फळधारणा होणार नाही असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आणि त्यामुळे मोहोर खराब होऊन जाईल अशी भीती आता शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसामुळे अ‍ॅथ्रॅक्सनोज दिसू लागणार असून सध्या बिटकीवर परिणाम होईल. दहा ते बारा तासांच्या अंतराने पाऊस पडत असल्याने औषध फवारणीला वेळ मिळत नाही. आणि एकदा फवारणी झाल्यानंतर २४ ते ३० तासांच्या कालावधीत पाऊस पडला नाही तर त्या फवारणीचा फायदा होतो. मात्र १२-१३ तासांच्या अंतराने पडणाऱ्या पावसामुळे फवारणीचाही काही फायदा होत नाही आहे. जर आणखी दोन दिवस पाऊस असाच राहिला तर पिकांना धोका निर्माण होवू शकतो. पाऊस पडून गेल्यानंतर ऊन पडले तर धोका कमी होतो. पण जर वातावरण ढगाळच राहिले तर मोहोर ओला राहतो आणि त्यावर बुरशी येण्याची भीती दाट होते.

Leave a Comment

error: Content is protected !!