अवकाळी पावसाचा तडाखा ; ढेबेवाडी परिसरातील २५ हुन अधिक घरांवरील पत्रे उडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्याचे वातावरण पाहता मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट आली आहे तर सांगली , कोल्हापूर, सातारा या भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मागील तीन दिवसांपासून नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. विभागातील कसणी, मत्रेवाडी,रूवले आदी गावातील घरांचे मोठे नुकसान.. डोक्यावरचे छप्परच उडाल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले असून अनेक कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्मण झाला आहे.

ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले.डोंगर पठारावरील गावांना वादळाचा सर्वाधिक तडाखा जाणवला.दुर्गम कसणी परिसरातील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीवरील छप्पर वादळात उडून गेले.गेल्या काही वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे.तेथील शकुंतला संपत चोरगे,शंकर नामदेव पाटील,नाना आवजी पाटील,शंकर आनंदा पाटील यांची घरे वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अन्य वीस पेक्षा अधिक घरांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सरपंच महेंद्र गायकवाड यांनी दिली.

याबाबत बोलताना ते म्हणाले,अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली असून विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.घरांवर झाड पडल्याची घटनाही घडली आहे.सरपंच गायकवाड यांच्यासह पोलिस पाटील यशवंत पुजारी,तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग मेथे- पाटील आदींनी कसणी व परिसरात फिरून नुकसानीची माहिती घेतली. मत्रेवाडी येथील सदाशिव मत्रे, महादेव मत्रे यांच्या घरांचे छप्पर वादळात उध्वस्त झाले. रुवले येथील अनिल पाटील यांचे राहते घर व अन्य एकजनाचे शेड वादळात उध्वस्त झाले.

याशिवाय अन्य गावात ही नुकसानीच्या घटना घडलेल्या असून तेथील नुकसानीचा नेमका तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.वादळी पावसाने जनावरांच्या चाऱ्याच्या गंजी तसेच कैऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरांची छप्परे वादळात उडून दूरवर जावून पडली असून संबधित घरातील लोकांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने सुदैवाने जीवित हानी घडली नाही. महसूल विभागाकडून पंचनामा झाल्यानंतरच परिसरातील नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!