असे करा नारळ पिकातील अन्नद्रव्य आणि पाण्याचे व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :नारळ हे बागायती फळ झाड असून पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजे समुद्र किंवा नदीकाठच्या रेताळ, वरकस व मुरमाड तसेच मध्यम, भारी आणि अति भारी जमिनीत देखील लागवड करता येते. परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशा पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते. अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरला यावर म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागवड करावी. या लेखात आपण नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि त्यांची व्यवस्थापन तसेच पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत.

नारळाचे पाणी व्यवस्थापन

–नारळ पिकास पाण्याचा जास्त ताण पडल्यास माध्यम फुलांची गळ होते व फळ धारणेवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. त्याकरिता बागेत पुरेसा ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे.
–पाणी देण्यासाठी बुंध्याजवळ दीड ते दोन मीटर अंतरावर गोलाकार किंवा चौरस आळे करून पाणी द्यावे.
–जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल व त्याद्वारे पाणी द्यायचे असेल तर त्यासाठी वरील प्रमाणे अंतरावर गोलाकार किंवा चौरस लॅटरल पाईप टाकून त्याला किमान पाच ते सहा ड्रीपर लावावेत.
–लहान रोपास प्रतिदिन 10 लिटर पाणी द्यावे. मोठ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन 30 लिटर पाणी द्यावे. फेब्रुवारी ते मे पर्यंत प्रति दिन 40 लिटर पाणी आवश्यक असते.

नारळ पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे?

–नारळ फळपिकाच्या एक वर्षाच्या झाडांना खते देण्यासाठी बुंध्यापासून 30 सेमी अंतरावर, 30 सेंटिमीटर रुंद व 30 सेंटिमीटर खोल गोलाकार चर द्यावा. –चरामध्ये शेणखत, रासायनिक खत यांचे मिश्रण टाकावे. चर मातीने बुडवून पाणी द्यावे. रोपे जशी मोठे होतील तसेच चर बुंध्यापासून दूर घ्यावा. पाच वर्षावरील झाडांसाठी दीड मीटर अंतरावर चर द्यावा.
–साधारणपणे एक वर्षाच्या झाडाला 10 ते 15 किलो शेणखत किंवा गांडूळखत,500 ग्रॅम युरिया,600 ग्रॅम सुपर फॉस्फेटव 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. या प्रमाणामध्ये खताचे प्रमाण वाढवावे व पाच वर्षांपूर्वी झाडाला 50 ते 70 किलो शेणखत किंवा गांडूळखत, 2500 ग्रॅम युरिया, 3000 ग्रॅम सुपर फॉस्फेट व सोळाशे ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
–जर संकरित जात असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश पालाशची मात्रा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
–नारळाच्या चांगल्या वाढीसाठी दर सहा महिन्याला 50 ग्रॅम ऍझोस्पिरीलम, 50 ग्रॅम फोस्पॉ बॅक्टेरिया, 50 ग्रॅम व्ही ए एम जैविक खते शेणखतामध्ये एकत्र करून मुळांजवळ द्यावीत.जैविक खतांमध्ये रासायनिक खते मिसळू नयेत.
–माती परीक्षणानुसार झाडास दिड किलो सूक्ष्म द्रव्याची मात्रा तीन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता जून मध्येतर दुसरा हप्ता आक्टोबर आणि तिसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा.

संदर्भ – दैनिक जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!