शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या 45 दिवसात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मागच्या महिन्यात अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी पुन्हा केली. याशिवाय इतरही महत्त्वाच्या बाबींकडे अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

पिक कर्ज माफ केले पाहिजे. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहीजे. घर पुर्ण पडले किंवा अशंतः पडले तरच मदत दिली जाते. पण काही घरांना ओलावा येऊन भेगा पडतात. अशा घरांनाही मदत देण्यासाठी पंचनामे केले पाहिजेत. या अतिवृष्टीच्या काळात गोगलगायीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. आपल्या मदतीच्या निकषांमध्ये गोगलगायीने पिकांचे नुकसान केल्यास मदतीची तरतूद नाही. त्यामुळे याबाबीचा वेगळा निर्णय सरकारला घ्यावा लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!