शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 11 जून पासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टी यात पावसाचा जोर अधिक असेल. असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर मधून दिली आहे. याबरोबरच पुण्यात आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षीचा सर्वात मोठा सलग पाऊस असणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

17 जून पर्यंत पेरण्या टाळाव्यात

प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र नागपूर यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला त्यानुसार विदर्भात 10 ते 13 जून दरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वारे सुद्धा तशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणार आहे. राज्यस्तरावर सुद्धा कृषी विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी 17 जून पर्यंत पेरण्या करण्यात येऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी पुढील तीन-चार दिवसात पेरणी केल्यास अतिवृष्टीमुळे पेरणी दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे टाळावे असे आवाहन वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा

आजपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाडा नांदेड, परभणी हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!