विदर्भात उष्णतेची लाट तर राज्यातल्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , यंदाच्या वर्षी भीषण उष्णतेचा सामना केवळ राज्यातीलच नाही तर देशातील नागरिकांना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आता आशा आहे ती मान्सूनच्या आगमनाची … मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.लवकरच तो केरळ आणि महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात हजेरी लावेल अशी आशा आहे. पण त्यापूर्वी राज्यासह देशातल्या अनेक भागांना उष्णतेचा सामना करावा लागतो आहे.

राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भाच्या अनेक भागांत कमाल तापमानात घट झाली असली, तरी राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. १८) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम असून, तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे उष्णतेची लाट होती. तेथे राज्यातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंशांची वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाट होती. तर अकोला येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, अमरावती, नगर, वर्धा, जळगाव येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

‘या’ भागाला यलो अलर्ट

18 मे : आज दिनांक 18 मे रोजी परभणी, हिंगोली ,नांदेड, लातूर ,सोलापूर ,सातारा आणि कोल्हापूर सांगली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अकोला आणि अमरावती उष्णतेची लाट कायम राहणार आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये पावसाची शक्‍यता आहे.

19 मे : दिनांक 19 मे रोजी सातारा, सांगली ,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर ,परभणी ,नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस(Monsoon 2022) हजेरी लावण्याची शक्यता आहे तर पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पश्‍चिम विदर्भापासून, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १८) तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्याच्या जिल्ह्यात ढगाळ हवामान, वादळीवारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!