बिहारमध्ये वादळी पावसाचा कहर ! 25 जणांचा मृत्यू ; राज्यातही अनेक ठिकणी पावसाची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : (Weather Update Today)राज्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाली असून पुण्यासह अनेक ठिकाणी आज सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. शिवाय राज्यातील अनेक भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने(Monsoon) हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर , कोकणाचा काही भाग ,सातारा ,अहमदनगर या भागांचा समावेश आहे. हवामान विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे गुरुवारी सर्वाधिक ५५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आजही राज्यातील काही भागात वातावरण ढगाळ राहणार असून वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामन विभागाचे तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार IMD ने 27 मे चा केरळला नैऋत्य मोसमी पावसाचा म्हणजेच मान्सूनचा अंदाज दिला आहे. म्हणजेच येत्या २७ मे पासून ४ दिवस आधी किंवा ४ दिवस नंतर या त्रुटीनुसार मान्सून केरळ मध्ये हजेरी लावू शकतो. हवामान खात्याकडून जारी केलेल्या 4 आठवड्यांच्या पावसाच्या अंदाजानुसार, दुस-या,तिस-या आठवड्यात पश्चिम किनार्‍यावर पावसाचा जोर असेल. मान्सूनची(Monsoon) केरळला सुरुवात झाल्यानंतर,पुढचा अंदाज‌ परिस्थितीनुसार दिला जातो. अशीही माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. एकदा मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्यास नंतर हळूहळू तो कर्नाटक आणि महाराष्ट्रात हजेरी लावतो. यंदा मान्सूनचे आगमन निर्धारित वेळेपेक्षा आधी झाले आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update Today)हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

बिहारमध्ये वादळी पावसाचा कहर

बिहारमध्ये गुरुवारी वादळी पावसाने कहर केला. बिहारच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळ आलं आणि त्यानंतर काही वेळाने हलका आणि जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यादरम्यान राज्यात विविध घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन, मुंगेरमधील दोन आणि जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यावेळी अनेक ठिकाणी कच्चा घरे आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीसह वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!