उष्णतेपासून दिलासा ! पुण्यासह राज्यातील विविध भागात ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असानी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. काल दिनांक ११ मे रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अद्यापही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवतो आहे. मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या भागात ढगांचे दाट पट्टे दिसत आहेत. तसेच पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, गोवा ,कोकण यासह मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार असून वाऱ्यासह काही भागामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान , विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र उद्या दिनांक १३ मे रोजी चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्याना हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्याच वेळी, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये ‘आसानी’ चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि समुद्रातील वादळामुळे राज्यात थंड वारे वाहू शकतात, परंतु उत्तर भारतातील भागात उष्णतेवर त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!