ढगफुटी म्हणजे नेमके काय ? काय असते याची प्रक्रिया ? जाणून घ्या !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय याची माहिती करून घेणार आहोत.

ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते?

गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.
गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधी-कधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो.

हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधी-कधी 3.5मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ्या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठ-मोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.

हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.

ढगफुटीमुळे नक्की काय होते ?

ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

डाऊनड्राफ्ट जास्त धोकादायक

वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. विमान अशा स्तंभात सापडले तर हमखास कोसळते. जगातील अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या आधीच हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.

 

संदर्भ -दैनिक जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!