शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करताना काय काळजी घ्यावी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी लगेचच आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली मात्र त्यानंतर सलग दोन-तीन आठवडे पावसाने दांडी मारल्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे उभारले आहे. मग अशा वेळी दुबार पेरणी करायची झाल्यास यापुढे कोणते पीक घ्यावे आणि त्याची पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे पाहणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती आजच्या लेखात घेऊयात. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आली आहे. (नांदेड जिल्ह्यात पिकांची उगवण कमी झाल्याने कोणती काळजी घ्यावी याबाबत आवाहन करण्यात आले. )

सोयाबीन

सोयाबीन पिकाची उगवण कमी झाल्यामुळे त्या जमिनीमध्ये दुबार पेरणी करायची झाल्यास त्या ठिकाणी सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद व सूर्यफुल त्याचप्रमाणे या पिकांवर आधारित आंतरपीक पद्धतीने या पिकांची पेरणी करता येईल. या पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची निवड करावी.

दुबार पेरणीसाठी वाणांची निवड

तुर– बीडीएन 711, बीडीएन 716, बीएसएमआर 736
मुग – बीएम 2003-2, बीएम 2002-1, बीएस 145, बीएम 4 उडीद -टीएयु 1, बीडीयु 1
ज्वारी– परभणी शक्ती, पीव्हीके 809, परभणी श्वेता, सीएसव्ही 15
कापूस– एनएचएच 44 बीटी व अन्य वान

दुबार पेरणी करताना घ्यावयाची काळजी

— सध्या खरीप पिकांची पेरणीची वेळ संपलेली नाही त्यामुळे सर्व खरीप पिकांची पेरणी करता येईल.
–सात जुलैपर्यंत पेरणी करताना लागवड पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.
–पेरणी करताना पिकास अनुरूप बीजप्रक्रिया अवश्य करावी. यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थायरम किंवा कार्बेन्डाझिम तीन ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे प्रमाणात बियाण्यास चोळावे. तसंच डाळ वर्गीय पिकाकरिता रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम पावडर किंवा दहा मिली द्रवरुप संवर्धक प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
— ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीने चार : एक किंवा चार : दोन प्रमाणात पेरणी केली व त्यामध्ये तुरीची उगवण समाधानकारक असून सोयाबीनची उगवण कमी असल्यास पूर्ण जमिनीवरील पीक न मोडता केवळ सोयाबीनची बैल चलित तिफणी द्वारे पेरणी करावी अथवा सोयाबीनचा ओळी ऐवजी तुरीची एक ओळ टोकण करावी.
–यापूर्वी सोयाबीन पिकास रासायनिक खतांची मात्रा दिली असल्यास त्या ठिकाणी पुन्हा सोयाबीन पेरताना खतांची मात्रा देण्याची आवश्यकता नाही. सोयाबीन ऐवजी दुसऱ्या पिकाची पेरणी करायची असल्यास पूर्वी दिलेल्या खताची मात्रा विचारात घेऊन नवीन पिकासाठी खताची मात्रा द्यावी.
–सोयाबीन पिकाची पेरणी करायची असल्यास आणि त्याचे बियाणे बाजारातून घेतल्यास अथवा उपलब्ध न झाल्यास घरचे सोयाबीन उगवण क्षमता तपासून वापरता येईल त्यासाठी उगवणक्षमता तपासणीकरिता उपलब्ध सोयाबीन मधील शंभर दाणे मोजून मातीमध्ये अथवा ओल्या पोत्यावर ओळींवर ठेवून ते झाकावे अथवा पोते गुंडाळून ठेवावे.एक आठवड्यापर्यंत माती किंवा पोते ओलसर ठेवावे एक आठवड्यानंतर सदरील बियाणे काढून उगवण झालेल्या बियांची संख्या मोजावी आणि उगवणक्षमता टक्केवारी ठरवावी. उगवणक्षमता किमान 70 टक्के असणे आवश्यक आहे. तथापि सद्यस्थितीमध्ये बियाणे उपलब्ध कमी असल्याने 60 टक्के उगवण क्षमता असणारे बियाणे वापरता येईल. तथापि कमी उंचीच्या तुलनेत बियाणांच्या प्रति एकरी प्रमाण वाढवावे.

उगवणीपूर्वी तणनाशक फवारणी केली असल्यास

यापूर्वी सोयाबीनची पेरणी करून व त्या जमिनीवर दुबार पेरणी करायची झाल्यास त्या जमिनीवर उगवणीपूर्वी तणनाशक फवारणी केली असल्यास पुढील पीक निवडीवर मर्यादा येते. साधारणपणे शेतकऱ्यांनी पेंडिमिथ्यालीन किंवा दायकलोसूलाम या तणनाशकांचा वापर केला आहे असे आढळल्यास या परिस्थितीमध्ये या तणनाशकाचा वापर झालेला जमिनीवर दुबार पेरणी करताना पुढील पीक निवडता येतील. मूग उडीद, कापूस, तूर, सोयाबीन.

सोयाबीनची उगवण कमी झाल्यामुळे किंवा उगवणंच न झाल्यामुळे त्याचे क्षेत्र तसेच नापेर न ठेवता वरील प्रमाणे पिकांची पेरणी करावी साधारणतः 15 ते 20 जुलैपर्यंत पेरणी करता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

संदर्भ – दैनिक सकाळ नांदेड

Leave a Comment

error: Content is protected !!