परभणीचा तरुण शेतकरी म्हणतोय विकेल ते पिकेल ! झेंडूच्या शेतीतून अवघ्या पन्नास दिवसात मिळवला ७० हजार रुपयांचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

आता शेतात विकेल तेच पिकेल म्हणत परभणी जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात कालानुरूप बदल करत एक वेगळी वाट शोधली असून यातून त्याने शेती आर्थिक दृष्ट्या परवडणारी केली आहे. शेती करताना दूरदृष्टी ठेवत, हंगामनिहाय नियोजन करत प्रतिकूल परिस्थितीतही यंदा त्याने झेंडू पीकातून अवघ्या पन्नास दिवसात ७० हजार रुपयांचा नफा कमावला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरगव्हाण या गावातील २३ वर्षीय वैभव भगवानराव खुडे हा बीकॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा तरुण शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहे. वैभव कडे बागायती दहा एकर शेती आहे .यात मागील अनेक वर्षापासून त्याचे वडील परंपरागत पिके घेत होते. पण यातून म्हणावा तसा नफा आपल्या वडिलांना मिळत नसल्याचे वैभवने पाहिले व अनुभवले आहे. याचदरम्यान बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैभवने शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरवात केली. कुटुंबातील आई वडील व छोटा भाऊ अतुल ,बहीण रूपाली यांचे सहकार्य घेत शेतात अमुलाग्र बदल केले आहेत. स्वतःकडे असणाऱ्या क्षेत्रावर विकेल ते पिकेल तत्व अंगीकार करत बाजारात मागणी असलेले व कमी कालावधीत अधिक नफा देणारी पिके घेण्याचे त्यांने ठरवले आहे. याची प्रत्यक्ष अमंलबजावणी करताना यंदा पन्नास दिवसापूर्वी लागवड केलेल्या झेंडू पिकातून त्याने सुमारे ७० हजार रुपयांचा नफा कमवत ते सिद्ध केलंय.

यंदा दसरा दिवाळी या सणाला झेंडू फुलाची मागणी पाहता वैभवने ५ सप्टेंबर रोजी दहा गुंठे क्षेत्रावर चार बाय दोन अंतरावर कलकत्ता झेंडू वाणाच्या १३०० रोपांची लागवड केली होती. पिक जोमात येण्यासाठी सेंद्रिय व गरजेनुसार रासायनिक खते व औषधांचा वापर करत अवघा दहा हजार रुपये खर्च केला. शनिवार २४ ऑक्टोबर रोजी दसरा सणाच्या पूर्वसंध्येला त्याच्या शेतातून करार केलेल्या व्यापाऱ्यांने जागेवरच ८० रुपये दराने त्याच्या झेंडूची खरेदी केली. सुमारे दहा क्विंटल एवढी फुले निघाल्याने वैभवला ८०हजार रुपये पदरात पडले आहेत खर्च वजा जाता या पिकातून ७० हजार रुपयांचा त्याला नफा झाल्याचे तो अभिमानाने सांगत आहे. या पिकातून पुढील काही दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या वेळीही फुलांचे अंदाजे दहा क्विंटल उत्पादन मिळत आणखी पैसे मिळण्याचे वैभवला अपेक्षा आहे. उत्पादन मिळवण्यासाठी त्याला दोन हजार रुपये खर्च येईल असे तो सांगतो.

गावातील शेतकऱ्यांनाही घेतले सोबत …

वैभव सोबतच लताबाई स्वयंसहाय्यता शेतकरी गटातील शेतकरी भागवत दत्तात्रय इंगळे यांनी ६ गुंठे क्षेत्रावर झेंडू तर भुजंग सीताराम इंगळे यांनी बारमाही मागणी असणाऱ्या गलांडा फुलांची १० गुंठे क्षेत्रावर लागवड शेतीतून अधिकचा नफा कमावला आहे .

समुह शेतीची करतोय बांधणी …

वैभवने परवडणारी शेती करत कुटुंबाचा अर्थकारण वाढवले आहे . याशिवाय गावातील इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत सोबत घेतले आहे .यातून त्याने गट शेती व शेतकरी उत्पादक कंपनी हि स्थापित केली आहे .या गट व कंपनीला त्याने आपल्या जन्मदात्या आईचे नाव ‘लताबाई ‘ दिले आहे .यामागे काबाडकष्ट केलेल्या आईचे नाव व्हावे अशी त्याची इच्छा आह.

वैभवने त्याच्या शेतात यापूर्वीच रेशीम शेती सुरू केली आहे . त्यासाठी त्याने तीन एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे .या शेतीत गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्याने जम बसविला आहे . बोरगव्हाण तालूक्यात रेशीम कोष उत्पादक गाव म्हणून ओळखलं जातं . आता स्थापन केलेल्या लताई शेतकरी प्रोडूसर कंपनी च्या माध्यमातून भविष्यात गावात उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया व ब्रँडिंग करत विक्री करण्याचा त्याचा मानस आहे . यातून गावचे हे अर्थकारण सुधारेल असे तो अभिमानाने सांगतो .जिल्ह्यातील इतरही तरुण आता वैभव सारख्या तरुणाचा आदर्श घेत शेती नफ्याची होणारी एक वेगळी वाट शोधतील यात शंका नाही .गरज आहे बदलत्या काळानुरूप निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी करण्याची .

Leave a Comment

error: Content is protected !!