सांगली ः येत्या १० तारखेला बकरी ईद हा सण आहे. त्यामुळे मिरज येथील शेळ्या मेंढ्यांचा बाजार तेजीत आहे. मागील दोन वर्षात कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाजार भरले जातात नव्हते. शिवाय सर्वच सण सध्या पद्धतीने साजरे केले जात होते. मात्र यंदाच्या वर्षी ईद सणाच्या निमित्ताने मिरजेतील शेळ्या मेंढ्यांचा बाजार फुलाला आहे. बुधवारी या बाजारात ८७ लाख ८० हजार रुपयांची उलाढाल झाली.
मिरजेतील बाजारात लाखोंची उलाढाल
मिरज येथील श्यामराव बंडू पाटील दुय्यम बाजार आवार हा जनावरांच्या बाजारासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे बाजाराला लाखोंची उलाढाल होत असते. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने एक वर्षे जनावरांचे बाजार बंद होते. गेल्या वर्षापासून जनावरांचे बाजार सुरू झाले असले, तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सणानिमित्त बाजार बंद ठेवण्यात आले होते.
बुधवारी १३२२ शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यांसह कर्नाटकातून मिरज येथील जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. बकऱ्यांचा दर सरासरी ११५०० ते ४१ हजार रुपये राहिला.
मिरजेचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटक येथील खरेदीदार या ठिकाणी येतात. मात्र बुधवारी बाजारात आवक काही प्रमाणात कमी झाली. खरेदीदार जिल्ह्यातील इतर ठिकाणीही भरत असलेल्या बाजारात खरेदीसाठी गेले. त्यामुळे आवक कमी झाली. परिणामी बाजार तेजीत होता, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.