तुरीनंतर आता उडदानेही गाठला 8 हजारांचा टप्पा; थोड्याच शेतकऱ्यांकडे उडीद, निर्णय घेण्याची वेळ

black gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या शेवटी तुरीला चांगला भाव मिळतो आहे. सध्या तुरीला बाजारात मोठी मागणी असून तुरीला ८००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळतो आहे. तुरीपाठोपाठ आता उडीद ही बाजारात भाव खातो आहे. सध्या देशातील बाजार समित्यांमधील उडदाचे दर पाहता ८००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. सध्या खूप कमी शेतकऱ्यांकडे उडीद शिल्लक आहे. मात्र ज्यांनी उडीद साठवली आहे त्यांनी सध्याच्या चढ्या दराचा फायदा घेण्यास हरकत नाही.

महाराष्ट्रात उडदाची अजून मोठी आवक सुरू झालेली नाही. सध्या अगदी तुरळक माल बाजारात येतोय. सरासरी दर ८ हजार २०० रुपयांवर आहे. पुणे बाजारात ८ हजार ८०० रुपये तर सोलापूर बाजारात ८ हजार रुपयांनी उडदाचे व्यवहार झाले. सध्याचा दर हमीभावापेक्षा दीड हजार रुपयाने अधिक आहे. शेतकऱ्यांनी या भावपातळीवर नजर ठेऊन विक्रीबद्दलचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांनी सांगितले.

उडीद लागवडीत घट

केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात यंदाच्या खरिपात उडदाची लागवड ६ टक्क्यांनी कमी झाली. तसेच मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही भागांत उडीद पिकाला पावसाचा फटका बसला. तर उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये पाऊस आणि काही ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रातही उडीद पिकाचं नुकसान झालं आहे. मात्र काही भागांमध्ये पिकाला अनुकूल स्थिती असल्याचं सांगितलं जातयं.

दर दबावाखाली येण्याची शक्यता

मागील आठवड्यापर्यंत देशात उडदाच्या बाजारात तेजीत होती. मात्र बर्मानं आपल्या चलनाचं अवमूल्यन केलंय. त्यामुळे बर्मातून भारतात उडदाची स्वस्तात आयात होऊ शकते. बर्मा हा भारताला उडीद पुरवणारा महत्वाचा देश आहे. त्यामुळे देशात सध्या उडदाचे दर स्थिरावले आहेत. पुढील काळात देशातील खरीप उत्पादन आणि आयात माल यामुळे पुरवठा वाढेल. त्यामुळे दर दबावाखाली येऊ शकतात.